आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने कशी तयारी करावी? महापालिका जिंकण्यासाठी रणनीती काय असावी? या कारणासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर नागपुरात संपन्न झाले. या शिबिराला संबोधित करताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. निवडणूक काळात तापट स्वभाव घेऊन लोकांमध्ये वावरू नका, असा सल्ला देताना पाच दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका प्रसंगाचा दाखला त्यांनी आपल्या भाषणात दिला.
advertisement
मनोहर पर्रीकरांसारखे फिरा, महिलेचा सल्ला, अजित दादांची सटकली
परवा पुण्यात एका ठिकाणी पाहणी करायला गेलो असतो मनोहर पर्रीकरांसारखे फिरा, असा सल्ला मला एका भगिनीने दिला. तिला काय माहिती हा अजित पवार सकाळी सहा वाजता उठून कामाला लागतो. विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पुण्यातील भगिनीला उत्तर दिले. अजित पवार यांच्या या उत्तरावरून पर्रीकरांसारखे फिरा हा शब्द त्यांना चांगलाच बोचल्याचे दिसून आले. पुण्यातील भगिनीने दिलेल्या सल्ल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी अगदी लक्षात ठेवून अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावल्याचे दिसून आले.
वादापासून दूर राहा
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, लोकांमध्ये गेल्यानंतर तत्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे तेवढ्यापुरते ऐकून घ्या. संबंधित माणूस अमुक दिशा पूर्व म्हटला तर 'तुम्हीही तू म्हणशील तसंच' असे म्हणा. त्याच्याशी वाद घालू नका... अशा सूचना करून वादविवादाचे प्रसंग टाळण्याचा सल्ला अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.
काही लोक आपल्याला अडचणीत आणण्यासाठी पाठवले जातात
काही लोक आपल्याला अडचणीत आणण्यासाठी पाठवण्यात येतात. तिथे कॅमेरा लावून आपण त्यांना उलटी उत्तरे देत आहेत, असा आरोप करून तेवढाच व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरवला जातो ज्यातून आपली बदनामी होते. या सूचना केवळ तुम्हालाच आहेत असे नाही तर माझ्याही मनाला मी हेच सांगत असतो, असे म्हणत सोलापूरच्या कुर्डू गावातील आयपीएस अधिकाऱ्याच्या फोन प्रसंगाचा अप्रत्यक्ष उल्लेख अजित पवार यांनी केला.