राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुनरुच्चार करत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील काही आमदारांच्या वादग्रस्त कृतीमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कृतीवरून आता पक्षांतर्गत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियमित बैठकीला संग्राम जगताप अनुपस्थित राहिले. या गैरहजेरीबाबत अजित पवार यांनी थेट बैठकीत नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर त्यांनी उपस्थित आमदारांसमोर संग्राम जगताप यांच्या अलीकडच्या विधानांवरही नाराजी व्यक्त करत, अशा कृती पक्ष सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
advertisement
अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. अशा पक्षात राहून जर कोणी आमदार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारी किंवा आक्षेपार्ह विधाने करत असेल, तर ती पक्षाच्या धोरणाला बाधा आणणारी गोष्ट असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणाऱ्या अशा विधानांबाबत अजित पवार स्वतः संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी आमदारांना दिली. "अशा प्रकारच्या कृती मागचं कारण काय, हे मी स्वतः विचारणार असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीला दांडी का? संग्राम जगताप यांनी सांगितलं...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बैठकीच्या अनुपस्थिती बाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी वारीला असल्यामुळे मंगळवारच्या बैठकीला येऊ शकलो नाही. पण दोन दिवसात अजितदादांची भेट घेऊन त्यांना माझे म्हणणे सांगणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला फोनवरून दिली आहे.
वादग्रस्त वक्तव्याने संग्राम जगताप चर्चेत...
मागील काही महिन्यांपासून संग्राम जगताप यांच्याकडून अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर भाषणात केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.