मागील आठवड्यापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर समझोता झाला.. महाराष्ट्र ॲालम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या तीन टर्मच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. अजित पवार यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांसाठी अमित शाहाही आग्रही होती. मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी तसे आदेश दिल्यानं फडणवीसांनी मोहोळांचा विजय निश्चित करण्यासाठी भेटीगाठी सुरू केलेल्या. क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोहोळ यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करण्यात आलेली. पण, शुक्रवारी दिल्लीत यासंदर्भात दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक झाली. ज्यात मोहोळांच्या माघारीवर शिक्कामोर्तब झालं.
advertisement
भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघंही सत्तेत आहे. अशावेळी दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात लढणं यातून चुकीचा संदेश जात होता. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूकीपुर्वीच समझोता घडवून आणण्यात आला. ज्यानुसार आता अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात अर्धा-अर्धा कार्यकाळ दोघांनाही मिळणार म्हणजेच अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रत्येकी दोन-दोन वर्ष अध्यक्षपद मिळेल.त्याचबरोबर मोहोळ यांच्या गटाकडे सरचिटणीस आणि खजिनदार पद जाणार आहे. निवडणुकीपुर्वी मित्रपक्षाशी समझोता झाल्यानं अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय.
खरंतर ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोघांपैकी एक जण माघार घेईल अशी अपेक्षा होती. पण, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ दोघांनीही अध्यक्षपदाचा आग्रह लावून धरत निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली. पण, उशिरा का होईना, आता महायुतीत तोडगा निघालाय. पण, यात भाजपचीच सरशी झाल्याची चर्चा आहे. कारण, दोन वर्षानंतर का होईना ठरल्याप्रमाणे अजित पवारांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागणार आहे.
रविंद्र धंगेकर यांच्याकडून अजित पवारांचे अभिनंदन
31 सदस्य संघटनांपैकी तब्बल 22 संघटनांचा पाठिंबा मिळवत महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन वर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन.
