अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात लावणी सादर झाल्याची चित्रफित समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाली. चित्रफितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी बसल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर नटरंग चित्रपटातील 'मला जाऊ द्या ना घरी-आता वाजले की बारा' या गाजलेल्या लावणीवर एक महिला नृत्य करीत आहे. ही महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
नृत्य करणाऱ्या महिलेचा खुलासा
नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दिवाळी मिलन कार्यक्रम असल्याने मी या कार्यक्रमाला हजर होते. तिथे वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीचे कला सादर करत होते. यावेळी मी लावणी कलाकार असल्याने मी माझी कला सादर केली. यावेळी अनेक महिला कार्यकर्त्या आणि पुरुष कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. हे सगळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील लोक उपस्थित होते. यामध्ये काही चुकीचा प्रकार घडला नाही. अशा पद्धतीचा खुलासा व्हिडिओच्या माध्यमातून शिल्पा शाहीर यांनी केला आहे.
शहराध्यक्षांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस
नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमादरम्यान पक्षाचे काही पदाधिकारी यांनी नृत्य आणि नाचगाणी यासारखा कार्यक्रम पक्षाच्या कार्यालयात घेतल्यामुळे त्याचा प्रसार आणि समाज माध्यमामध्ये प्रसिद्धी होऊन पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार, या प्रकरणाबाबतचा आपला लेखी खुलासा सात दिवसांच्या आत त्यांचेकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर राष्ट्रवादीचे विशेष लक्ष
महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहेत. पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड महापालिकांत पक्षाची कामगिरी उंचावण्याचा अजित पवार यांचा मानस आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्त जास्त उमेदवार निवडून आणण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.
