२८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी केली. त्यांनी याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्वात हा अर्ज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा अपघात नाही तर घातपात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी अर्जातून करण्यात आली आहे.
advertisement
या प्रकरणात VSR Ventures Private Limited ही विमान कंपनी, तिचे संचालक विजय कुमार सिंह व रोहित कुमार सिंह, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) चे संबंधित अधिकारी, तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रार अर्जात आरोप आहे की, अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि आवश्यक तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली, असा गंभीर आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
तक्रार अर्जानुसार हा केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन यामुळे घडलेली गंभीर घटना असून यात गुन्हेगारी कटाचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
खरं तर, मागील काही दिवसांपासून अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा एफआयआर दाखल करून घेतला जात नव्हता. आता शिर्डीत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एफआयआर दाखल करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
