आमदार रोहित पवारांनी ट्विट करून महायुतीतील तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केलाय. राज्य सरकारने 'वोटचोरी करून जमिनीची लुटमारी' असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला हरकत नाही', असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना 5 हजार कोटींची सिडको जमीन, पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 1800 कोटींची जैन बोर्डिंग जमीन, पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 500 कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टीची जमीन, संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची MIDC ची राखीव जमीन, संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या भाजपची 200 कोटींची अंजली टॉकीजची जमीन, पुण्यात अजित पवारांच्या पक्षाची 300 कोटींची कोरेगाव पार्क जमीन, अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या पक्षाची जैन समाजाची जमीन, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भाजपची SRAची हजारो कोटींची जमीन.... असे एका पाठोपाठ एक आरोप करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दणका दिला.
advertisement
रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही जशास तसंच उत्तर दिलं. मुंढवा जमीन प्रकरणात एकही रुपयाची व्यवहार झालेला नाही, असा दावा अजित पवारांनी केला. तसेच निवडणुका आल्या की असे आरोप होतात, असे ते म्हणाले. रोहित पवारांनी जमीन प्रकरणावरून अजित पवारांवर तोफ डागली. मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आधीच पार्थ पवारांची पाठराखण केलीय.
जमीन व्यवहारावर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्याचं स्पष्ट होतंय. तर अजित पवारांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना देशभरात गाजलेल्या 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरही भाष्य केलं. त्यावेळी माझ्यावर आरोप झाले, नंतर चौकशी केली, त्यात काहीही निघाले नाही, असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्यावर भाजपनेच 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र त्यात पुढे काहीच झालं नाही. नंतर त्याच अजित पवारांना भाजपनं एकदा नव्हे तर दोनदा उपमुख्यमंत्रीही केलं. भाजपनं अजित पवारांच्या सिंचन घोटळ्याच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे सादर केले होते. असं असतानाही आरोप सिद्ध झाले नाही. तोच संदर्भ देत अजित पवारांनी यावेळीही विरोधक पार्थ पवार जमीन प्रकरणी फक्त आरोप करत असल्याचा दावा केलाय. आता या प्रकरणात काय निष्पन्न होतं, हे लवकरच स्पष्ट होईल.
