घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बाहेरच्या तेलकट पदार्थांऐवजी घरच्या घरी बनवलेले, आरोग्यदायी नाश्ते पसंतीस उतरत आहेत. प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेले सोयाबीन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीत लोक केवळ पोट भरण्यावर न थांबता, पौष्टिक आणि चवदार पर्यायांकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत. बाहेरच्या तेलकट पदार्थांऐवजी घरच्या घरी बनवलेले, आरोग्यदायी नाश्ते पसंतीस उतरत आहेत. प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेले सोयाबीन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. लहान मुलांच्या वाढीसाठी, काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही सोयाबीन उपयुक्त ठरते. त्याच सोयाबीनपासून तयार होणारे हे पकोडे केवळ चवीलाच नव्हे तर पोषणमूल्यांनाही न्याय देतात. थंडीच्या दिवसांत गरमागरम पकोडे आणि वाफाळता चहा असा संगम कोणाला नकोसा वाटेल? तर आज आपण सोयाबीन पकोड्याची रेसिपी पाहणार आहोत.
सोयाबीन पकोडे साहित्य
सोयाबीन – 1 कप (6–8 तास भिजवलेले)
बेसन – ½ कप
आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
लाल तिखट – चवीनुसार
धणे-जिरे पूड – ½ टीस्पून
गरम मसाला – चिमूटभर
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
सोयाबीन पकोडे कृती
सोयाबीन गरम पाण्यात 5 मिनिटे उकळून घ्या, मग त्यातून पाणी काढून बाजूला ठेवा. एक भांडे घ्या, त्यात हे सोयाबीन टाका. त्यावर बेसन, आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घाला.आणि एकत्र करून घ्या. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापल्यावर चमच्याने किंवा हाताने मिश्रणाचे छोटे पकोडे सोडावेत. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. किचन पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून टाका.
advertisement
सर्व्हिंग टिप
गरमागरम सोयाबीन पकोडे पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत आणि वाफाळत्या चहासोबत दिल्यास मजा येतेच.
खास टिप
पकोडे अधिक कुरकुरीत हवे असतील तर मिश्रणात 1 टीस्पून तांदळाचे पीठ घालू शकता. हेल्दी पर्यायासाठी हे पकोडे एअर फ्रायरमध्येही करता येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 7:07 PM IST





