जय पवार यांचा साखरपुडा पुण्यातील फार्महाऊसवर काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. आता जय आणि ऋतुजा पाटील यांचा लग्न सोहळा बहरीन देशात होत आहे. या सोहळ्याला पवार आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत. शुक्रवारी संगीत आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आज शनिवारी लग्नसोहळा संपन्न झाला.
अजितदादा-रोहित पवार यांचा एकत्रित डान्स
जय पवार यांची वरात लग्न मंडपाच्या दिशेने जाताना अजित पवार, त्यांच्या भगिनी आणि पुतणे रोहित पवार यांनी 'सैराट' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरला. अजित पवार कायम अधिकाऱ्यांना दरडावणारे, सहकाऱ्यांना सुनावणारे अशा रुपात महाराष्ट्राला दिसतात. परंतु लेकाच्या लग्नात त्यांचे वेगळे रुप महाराष्ट्राला पाहायला मिळाले.
advertisement
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांचे विशेष सख्य नव्हते. दोघेही नेते वेळोवेळी एकमेकांवरही टीका करीत. परंतु अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळी विरोधक अजित पवार यांना टार्गेट करीत त्यावेळी रोहित पवार मात्र काका अजित पवारांची बाजू घेत. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, हाच संदेश त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते देत. भाऊ जय पवार यांच्या विवाह सोहळ्यात रोहित पवार यांनी हजेरी लावून काका अजित पवार यांच्याबरोबर नृत्य करून विशेष 'घरोबा' जपला.
शरद पवार, सुप्रिया सुळे लग्नसोहळ्याला गैरहजर
विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी लग्नसोहळ्याला जाणे टाळल्याचे सांगण्यात येते.
