आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने कशी तयारी करावी? महापालिका जिंकण्यासाठी काय रणनीती असावी? या कारणासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर नागपुरात संपन्न झाले. या शिबिराला संबोधित करताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.
सुनेत्रा पवार-अजित पवार यांच्यात जुगलबंदी
संघटना कशी वाढवावी याबद्दलच्या सूचना मला सुनेत्रा पवार यांनी केल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकांत उमेदवारी कुणाला द्यावी, याबद्दलचे सूतोवाचही त्यांनी केले. या सगळ्यासंदर्भात त्यांनी आधीच मार्गदर्शन केले असते तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो... असे मिश्किलपणे अजित पवार म्हणाले. माझ्या भाषणासंबंधीचा गृहपाठ आधीच सुनेत्रा पवार करून घेतात, असे चिमटेही अजित पवार यांनी काढले. दादांच्या फटकेबाजीवर उपस्थित नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
advertisement
गृहपाठ करूनच भाषण, सुनेत्रा पवार नोंदी ठेवतात, चुकले तर माझे काही खरे नाही
यापूर्वी मी भाषण करायचो तर रात्रभर माझा गृहपाठ व्हायचा आणि मग मी भाषण करायचो. आता फक्त असे झाले की सुनेत्रा पवार यांनी आधी भाषण केले, मी नंतर करतोय. रात्री माझा गृहपाठ झाला, त्या पद्धतीने आज मी भाषण करतोय. आता समोर सुनेत्रा बसलीये, तिथे नोंद चाललीय. कुठलं बरोबर आहे, कुठलं नाही, ती वहीत टिक करतीये. भाषणात काही राहिले तर माझे काही खरे नाही, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या फटकेबाजीवर सुनेत्रा पवार यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला. सुनेत्रा पवार यांच्या शेजारी बसलेले सुनील तटकरे यांनाही हसू आवरले नाही. उपस्थित मंत्र्यांनीही टाळ्या वाजवून अजित पवार यांच्या मिश्किल फटकेबाजीला दाद दिली.
सुनेत्रा पवार यांनी भाषणात काय म्हटले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षमपणे उभे करण्यासाठी विचारपूर्वक विस्ताराच्या रोडमॅपबाबत विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या वैचारिक आणि विकासाच्या मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्राबाहेरील किमान १०-१५ महत्त्वपूर्ण मतदारसंघांची निवड करून, त्यावर लक्ष केंद्रित करणे, त्या ठिकाणी विजय मिळवणे किंवा सक्षमतेने वाटाघाटी करणे यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी समाज रचना, स्थानिक प्रमुख तीन समस्या आणि बूथ-स्तरीय आराखडा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी अधोरेखित केले.