पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. दुसरीकडे हवेलीचे दुय्यम निबंधक रविंद्र तारू यांच्यावरही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच तहसीलदार सूर्यकांत येवले यांचेही निलंबन करण्यात आले आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून वेगाने सूत्र हलत असताना अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे अनेकांचे लक्ष होते.
advertisement
अजित पवारांचे तोंडावर बोट, काहीही न बोलता निघून गेले
महार वतनाच्या जमीन प्रकरणात सरकारी नियम वाकवून पार्थ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्याने जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. एवढेच नव्हे तर १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना घेऊन दोन दिवसांतच खरेदीवेळची स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याच सगळ्या प्रकरणावर अजित पवार यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना गाठले. मात्र माध्यम प्रतिनिधींना बाजूला सारून अजित पवार नियोजित बैठकीला हजर झाले. माध्यम प्रतिनिधींचे प्रश्न टाळण्याकरिता त्यांनी काढता पाय घेतला. अजित पवार यांचे मौनव्रत बरेच काही सांगून जाते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एरवी माध्यमांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे अजित पवार मुलावर आरोप झाल्यानंतर मात्र काहीही न बोलता निघून गेले. स्वच्छ कामाचा आग्रह धरणारे, प्रशासनावर वचक असणारे अजित पवार अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र मुलावर आरोप झाल्यानंतर त्यांनी धरलेले मौनव्रत निश्चित बरेच काही सांगून जाणारे आहे.
