शिवसेना (ठाकरे) गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार्या या मेळाव्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात काय होणार याकडे लक्ष लागले आहे. गोगावले यांच्या होमग्राउंडवर मेळावा होत असल्याने राष्ट्रवादीकडून गोगावलेंना डिवचण्याचा प्रयत्न होतोय का, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज महाड मध्ये मेळावा पार पडत आहे. महाड येथील चांदे क्रीडांगणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या मेळाव्यात अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पालकमंत्री पदाचा तिढा कायम...
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सध्या आदिती तटकरे आणि मंत्रिमंडळातील शिवसेना‑शिंदे गटाचे भारदस्त मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपापासून कामाचे श्रेय कसच्या हाती जाणार यावर दोन्ही बाजूंनी कुरघोडी सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोगावले आणि तटकरे यांच्यात शाब्दिक चकमकही मध्यंतरी सुरू होती. त्यानंतर आता थेट गोगावलेंच्या होम ग्राउंडवर त्यांना आव्हान देण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.