मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. राज्य सरकार आणि महसूल विभागाकडून मुठे समिती सादर करण्यात आली होती. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सहनोंदणी महानिरिक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास निर्देश देण्यात आले होते. या समितीच्या अहवालात नेमकं आहे काय, वाचा संपूर्ण अहवाल...
advertisement
चौकशी अहवालात आहे तरी काय?
चौकशी अहवाल
दिनांक – 17/11/2025
सह दुय्यम निबंधक हवेली क्र.4, पुणे येथे नोंदविलेला खरेदीखत दस्त क्र.9018/2025 मध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करण्याकरिता या विभागाचे स्तरावर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र, पुणे यांचे दिनांक 06/11/2025 रोजीचे आदेशान्वये (परिशिष्ट-1) श्री.राजेंद्र मुठे, सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), म.रा. पुणे यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती नेमण्यात आली.
श्री.उदयराज चव्हाण, नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), म.रा. पुणे
श्री.धर्मदेव माईनकर, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग, पुणे
श्रीम.अनुजा कुलकर्णी, सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र.4,
नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे
श्री.संजय पाटील, अति.कार्य. सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी
क्र.12, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे
समितीची कार्यकक्षा –
श्री.अशोक आबाजी गायकवाड व इतर 271 तर्फे कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी आणि मे.अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय पाटील यांचे दरम्यान, मौजे मुंढवा येथील सर्व्हे नं. 88 हिस्सा नं. 1 ते 26 यांसी एकूण क्षेत्र 17 हे. 51 आर.पैकी 40 एकर या मिळकतीच्या खरेदीखताचा दस्त क्र. 9018/2025 बाबत दस्त़ नोंदणीमध्ये झालेल्या अनियमिततेची, नोंदणी अधिनियम, मुद्रांक अधिनियम तसेच इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अनुषंगाने नोंदणी विभागातील कार्यालयीन स्तरावरील अनियमितता व कार्यालयीन प्रक्रियेचे उल्लघंन याबाबत सखोल चौकशी करणे.
तपासणीचे मुद्दे -
दस्ताचा तपशील
विषयांकित दस्त क्र. 9018/2025, एकूण 716 पानांचा असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे- (परिशिष्ट-2)
1.
दस्त नोंदणी करणाऱ्या कार्यालयाचे नाव
सह दुय्यम निबंधक वर्ग-2, हवेली क्र. 4, पुणे शहर
2.
दस्त नोंदणी करणा-या अधिका-याचे नाव
श्री.आर.बी.तारु
3.
दस्ताचा प्रकार
खरेदीखत (Sale deed)
4.
दस्तातील लिहून देणार
श्री.अशोक आबाजी गायकवाड व इतर 271 यांचेतर्फे
कुलमुखत्यारधारक शितल तेजवानी. (पृष्ठ क्र.4/716 ते 18/716 )
5.
दस्तातील लिहून घेणार
अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील. (पृष्ठ क्र.18/716 )
6.
मिळकतीचे वर्णन
गाव मौजे मुंढवा, ता.हवेली, जि.पुणे येथील सर्व्हे नं. 88 हिस्सा नं. 1 ते 26 येथील जागेचे एकूण क्षेत्र 17 हे. 51 आर.पैकी 40 एकर (पृष्ठ क्र.18/716 व 20/716)
7.
दस्त निष्पादन दिनांक
20/05/2025 (पृष्ठ क्र.4/716 )
8.
दस्त नोंदणी दिनांक
20/05/2025 (पृष्ठ क्र.716/716 )
9.
दस्ताधीन मिळकतीचे बाजारमूल्य
रु.294,65,89,000/-(पृष्ठ क्र.715/716 )
10.
मोबदला
रु.300,00,00,000/-(पृष्ठ क्र.19/716 )
11.
दस्तावर अदा केलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी
मुद्रांक शुल्क रु.500/-
नोंदणी फी रु.30,000/- Challan No.MH002415308202526E दि.19.05.2025 (पृष्ठ क्र.01/716) Defaced Challan
12
दस्तासोबत जोडलेली कागदपत्रे
1) मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी यांचे पॅनकार्ड (पृष्ठ क्र.22/716)
2) मौजे मुंढवा, जि.पुणे शहर येथील 7/12 सर्व्हे नं.88/1 ते 26, क्षेत्र 17 हे.50 आर. (पृष्ठ क्र.23/716)
3) मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या संस्थेचे ठराव पत्र (पृष्ठ क्र.24/716)
4) श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड (पृष्ठ क्र.25/716)
5) जनरल मॅनेजर, डिआयसी, पुणे यांचे Letter of intent for Information Technology Unit (पृष्ठ क्र.26/716)
6) महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसूचना दि. 01/02/2024 (पृष्ठ क्र.27/716)
7) लिहून देणार यांची एकूण 89 कुलमुखत्यारपत्रे (पृष्ठ क्र.30/716 ते 714/716 )
दस्त नोंदणीबाबत घडलेली अनियमितता व त्याबाबतचे निष्कर्ष -
दस्तासोबत जोडलेल्या दि.27/07/2021 च्या 7/12 वर ‘मुंबई सरकार’ असे नमूद असून त्याला कंस आहे. त्याअर्थी सदर मिळकतीवर शासनाची मालकी असल्याचे दिसून येते. त्यापुढे हा ’7/12’ बंद झाला आहे, असे नमूद आहे. त्यावरील क्षेत्र 17 हेक्टर 50 आर व पोट खराब क्षेत्र 00 हेक्टर 20 आर असे नमूद आहे. दस्तास प्रॉपर्टी कार्ड जोडण्यात आलेले नाही. समितीला मिळालेल्या प्रॉपर्टी कार्ड नगर भूमापन क्र.1178 चे अवलोकन केले असता, मौजे मुंढवा, सर्व्हे नं.88 हा ‘7/12’ बंद होवून प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहे व त्यावर ‘मुंबई सरकार’ असा उल्लेख आहे. प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र 66,700 चौ.मी. असे आहे.
सदर खरेदीखताची नोंदणी करते वेळी, सह दुय्यम निबंधक हवेली क्र.4 यांनी ई-म्युटेशन प्रक्रिया पार पाडताना, ‘skip’ हा पर्याय वापरून दस्तातील मिळकत ‘जंगम’ (Movable) मालमत्ता दाखवून दस्ताची नोंदणी केली आहे. (परिशिष्ट-18)
निष्कर्ष – 1) वर नमूद केल्याप्रमाणे सदर मिळकत शासनाच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट पणे माहीत असताना व ती खरेदी देण्याचा अधिकार नाही, हे माहित असतानाही दस्तऐवजातील लिहून देणार व घेणार यांनी जाणीवपूर्वक दस्तऐवज नोंदणीस दाखल केला व त्याप्रमाणे कबुलीजबाब दिला.
2) सह दुय्यम निबंधक यांनी उक्त नमूद बाब दुर्लक्षित नसल्याचे अथवा त्याबद्दल खात्री करून घेतली नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नोंदणी अधिनियम, 1908 चे कलम 18 क (1) (ख) चे उल्लंघन झालेले आहे. (परिशिष्ट-3)
(अ) सदर दस्तातील मिळकतीचे बाजारमूल्य रु.294,65,89,000/-इतके दर्शविले असून, दस्तामध्ये मोबदला रु.300,00,00000/- नमूद आहे. सदर दस्तास नोंदणी फी रु.30,000/- अदा केलेली आहे. दस्तामधील मजकूरानुसार दस्ताधीन मिळकत संबंधित जमीन मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी संस्थेने खरेदी केल्याचे दिसून येते. दस्तावर आकारावयाच्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, अनुसूची -1, अनुच्छेद 25 ब नुसार 5% दराने मुद्रांक शुल्क अधिक 1% LBT अधिक 1% Metro Cess असे एकूण 7 % दराने रु. 21 कोटी मुद्रांक शुल्क आकारण्याऐवजी सदर दस्तावर रु.500/- इतके मुद्रांक शुल्क भरुन घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.
(ब) दस्तासोबत जोडलेल्या शासन अधिसूचना No. Mudrank-2023/UORNo.20/CR.602/M-
1, दि. 01/02/2024 अन्वये मुद्रांक शुल्कामध्ये माफी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. सदर मुद्रांक शुल्क माफीच्या पुष्ट्यर्थ संस्थेने जिल्हा उदयोग केंद्र, पुणे यांचेकडील दि. 24/04/2024 रोजीचे “Letter of Intent” दस्तासोबत जोडले आहे. परंतु उक्त अधिसूचनेच्या स्पष्टीकरण - 2 नुसार जनरल मॅनेजर, जिल्हा उदयोग केंद्र, पुणे यांनी दयावयाचे पात्रता प्रमाणपत्र (Eligibilty Certificate) जोडलेले दिसून येत नाही.
निष्कर्ष - खरेदीखतास घेण्यात आलेली मुद्रांक शुल्क़ माफी अनुज्ञेय ठरत नाही. त्यामुळे कमी मुद्रांक शुल्क आकारून खरेदीखताची नोंदणी केल्यामुळे सदर प्रकरणात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 34 चे उल्लंघन झाल्याची व शासनाचे महसूली नुकसान झाल्याची बाब निष्पन्ऩ होत आहे. (परिशिष्ट-4)
दस्तासोबत पृष्ठ क्र. 30/716 ते 714/716 वर लिहून देणार श्री.अशोक आबाजी गायकवाड व इतर 271 यांचेवतीने श्रीमती शितल तेजवानी यांना सन 2006 ते 2008 या कालावधीत दिलेल्या वेगवेगळया एकूण 89 कुलमुखत्यारपत्रांच्या प्रती जोडलेल्या असून, त्यापैकी 34 कुलमुखत्यारपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आलेली आहेत. उर्वरित 55 कुलमुखत्यारपत्रे ही नोटराईज्ड आहेत. उक्त नमूद 34 कुलमुखत्यारपत्रे ही कोणत्याही मोबदल्याचा उल्लेख न करता दिलेली दिसून येत आहेत तर उक्त़ नमूद 55 कुलमुखत्यारपत्रांमध्ये सदर कुलमुखत्यारपत्रे विकसन करारपत्रांवर आधारित असून त्यामध्ये नमूद मोबदल्याच्या अनुषंगाने देण्यात आली असल्याचे दिसून येते.
निष्कर्ष - उक्त नमूद 55 कुलमुखत्यारपत्रे योग्य मुद्रांकित असल्याचे आढळून येत नाहीत. सदर बाबतीत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 34 चे उल्लंघन झाल्याची बाब निष्पन्न होत आहे.
खरेदीखतासोबत जोडण्यात आलेल्या 89 कुलमुखत्यारपत्रांपैकी 34 कुलमुखत्यारपत्रांमध्ये कुलमुखत्यारपत्रधारक श्रीमती शितल तेजवानी यांची घोषणापत्रे सदर खरेदीखतासोबत जोडण्यात आलेली नाहीत.
निष्कर्ष - त्यामुळे नोंदणी विभागाने दिनांक -29/01/2007 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचा भंग केल्याची बाब निष्पन्न होत आहे. (परिशिष्ट-5)
उक्त नमूद 89 कुलमुखत्यारपत्रे मे.पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्च़र्स तर्फे शितल तेजवानी यांना सन 2006 ते 2008 या कालावधीत देण्यात आली आहेत. मात्र विषयांकित खरेदीखत लिहून देणार श्री.अशोक आबाजी गायकवाड व इतर 271 यांचे वतीने कुलमुखत्यारधारक म्हणून मे.पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्च़र्स तर्फे शितल तेजवानी असे निष्पादित (Execute) करण्याऐवजी त्यांनी शितल तेजवानी या व्यक्तिगत अधिकारात निष्पादित केला आहे.
निष्कर्ष – 1) वर नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिगत अधिकारात कुलमुखत्यारपत्र दिलेले नाही, हे माहित असतानाही श्रीमती शितल तेजवानी यांनी व्यक्तिगत अधिकारात दस्त निष्पादित केला.
2) सह दुय्यम निबंधकाने उक्त नमूद बाब तपासलेली आढळून येत नाही, त्यामूळे नोंदणी अधिनियम, 1908 कलम 34 व 35 नुसार नोंदणी प्रक्रिया पार पाडलेली दिसून येत नाही. त्यामुळे सदर कलमांचा भंग झाला आहे. (परिशिष्ट-6)
दस्तासोबत लिहून देणार (272 व्यक्ती) यांचे पॅन कार्ड जोडलेले आढळून येत नाही.
निष्कर्ष – याबाबत आयकर नियमाच्या अनुषंगाने विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाचा भंग केला आहे. (परिशिष्ट-7)
या प्रकरणात नोंदणी अधिकाऱ्यांने मुद्रांक शुल्क माफी देवून सदर दस्त नोंदविला असल्याने, अशाप्रकरणात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडील दि.28/11/2014 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार, सदरचे खरेदीखत माफी पडताळणीसाठी ‘तात्काळ तपासणी’ अंतर्गत मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांचेकडे पाठविणे अपेक्षित होते, परंतु सदरहू दुय्यम निबंधक यांनी सदरची कार्यवाही केल्याचे आढळून येत नाही.
निष्कर्ष – विभागाच्या दि.28/11/2014 च्या परिपत्रकातील निर्देशांचा भंग केला आहे. (परिशिष्ट-8)
सदर खरेदीखताची नोंदणी करताना कबुलीजबाबाच्या अनुषंगाने गोषवारा भाग 2 वर व सूची क्र. 2 मध्ये दस्त लिहून देणा-या अशोक आबाजी गायकवाड यांचे शिवाय इतर 271 पक्षकारांची नावे नमूद करणे आवश्यक होते.
निष्कर्ष – सह दुय्यम निबंधकाने नोंदणी प्रक्रिया पार पाडताना नोंदणी अधिनियम 1908 कलम 58 व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 नियम 30 व 31 मधील तरतूदींचा भंग केला आहे.
(परिशिष्ट-9)
सदर प्रकरणी कुलमुखत्यारधारक शितल तेजवानी व अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी खरेदीखत नोंदविताना, ‘मुंबई सरकार’ नाव कब्जेदार सदरी असलेले शासकीय जमीनीचे उतारे सादर करून व सदर उतारे हे ‘बंद’ 7/12 असलेले जोडून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येते.
तसेच अर्जदार यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांचेकडील अभिनिर्णय प्रक्रिया पूर्ण न करता, अभिनिर्णयास दिलेल्या मसूद्यात (परिशिष्ट-16) बदल करून वेगळ्या मसूद्याचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक हवेली क्र.4 यांचे कार्यालयात परस्पर नोंदविल्याचे दिसून येते. ही बाब विचारात घेता अर्जदारांनी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे स्पष्ट होते.
समिती समोर आलेल्या इतर बाबी व त्यानुसार समितीचा एकत्रित निष्कर्ष
अ) अभिनिर्णय कार्यवाही -
खरेदीखत दस्त क्र.9018/2025 नोंदविण्यापूर्वी सदर दस्तांमधील लिहून घेणार – मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयात दि.07/05/2025 रोजी सदर खरेदीखताचा अनिष्पादित(कोणत्याही पक्षकारांच्या सहया नसलेला) दस्तऐवजाचा मसुदा सादर केला होता.
उक्त अभिनिर्णय प्रकरणा सोबत पक्षकाराने जोडलेली कागदपत्रे -
1) अभिनिर्णय अर्ज
2) प्रतिज्ञापत्र
3) अधिकारपत्र
4) अभिनिर्णय ऑनलाईन अर्ज टोकन
5) अभिनिर्णय फी चलन प्रत
6) दस्तऐवजाचा मसुदा
7) मालमत्तापत्रक व 7/12
8) जिल्हा उदयोग केंद्र पुणे यांचेकडील दिनांक 24/04/2025 रोजीचे लेटर ऑफ इंटेंन्ट (Letter Of
Intent)
9) महाराष्ट्र राज्य नवीन माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, 2023 ची प्रत.
10) महसूल व वनविभाग यांचेकडील आदेश क्र.मुद्रांक-2023/अनौ./सं.क्र.20/प्र.क्र.602/म-1
(धोरण) दिनांक.01/02/2024.
अर्जदार यांनी अभिनिर्णय प्रकरणासोबत जोडलेल्या जिल्हा उदयोग केंद्र, पुणे यांचेकडील दि.24/04/2025 रोजीचे लेटर ऑफ इंटेन्ट (Letter Of Intent) नुसार महाराष्ट्र राज्य नवीन माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 अन्वये महसूल व वनविभाग यांचेकडील आदेश क्र.मुद्रांक-2023/अनौ./सं.क्र.20/प्र.क्र.602/म-1 (धोरण) दिनांक.01/02/2024 मुद्रांक शुल्कात माफी मिळणेबाबत मागणी केली होती.
त्याचप्रमाणे 1% स्थानिक संस्था कर व महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक एमसीओे-2018/प्र.क्र.230/नवी-14 दिनांक 08/02/2019 अन्वये 1% मेट्रो अधिभार यांस माफी नसल्याने, मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाची अंतरिम डिमांड नोटीस जा.क्र/पुणे शहर/अभि प्र.क्र.624/2025/6331/2025 दिनांक 09/05/2025 व्दारे अर्जदार यांना 1% स्थानिक संस्था व 1% मेट्रो अधिभार असे एकूण रक्कम रू.5,89,31,800/- भरणे बाबत अथवा लेखी म्हणणे सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. परंतू त्यांनी विहीत मुदतीत आपले कोणतेही म्हणणे सादर केले नाही. त्यांनी मुदतीत म्हणणे सादर केले असते तर प्रकरणावर गुणवत्तेवर अंतिम निर्णय घेण्यात आला असता. त्यांनी म्हणणे सादर न केल्याने प्रकरणावर अंतिम निर्णय झालेला नाही व अभिनिर्णय कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सदर प्रकरणात झालेली कार्यवाही अंतरिम स्वरूपाची दिसून येते. अर्जदाराने मुद्रांक जिल्हाधिकरी यांच्या दि.09/05/2025 च्या नोटीसला अनुसरून त्यांच्याकडे अभिनिर्णय अर्जासोबत सादर केलेल्या इरादापत्रा व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची वा आवश्यक ती कागदपत्रे (उदा.जनरल मॅनेजर डी.आय.सी. पुणे यांचेकडील मुद्रांक शुल्क माफीस पात्र उद्योगघटकाचे प्रमाणपत्र) सादर केले असते तर मुद्रांक जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणात आपला अंतिम आदेश पारीत करताना उक्त खरेदीखताबाबत मुद्रांक शुल्क आकारणीच्या दृष्टीने नियमोचित निर्णय घेता आला असता, असे निदर्शनास येत आहे.
तथापि संबंधित अर्जदाराने मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्या उक्त नमूद दि. 09/05/2025 च्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही व अभिनिर्णय प्रक्रिया पूर्ण करून घेतली नाही. त्यानंतर अर्जदारांनी अभिनिर्णयास दिलेल्या मसुद्यांत बदल करून वेगळया मसुद्याचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक हवेली क्र.4, पुणे शहर कार्यालयात परस्पर नोंदविल्याचे दिसून येते.
ब) तक्रार अर्जानुसार चुकविलेल्या मुद्रांक शुल्का अंतर्गत केलेली कार्यवाही –
मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी नोदणीकृत खरेदीखत दस्त़ क्र.9018/2025 बाबत त्यांच्याकडील दि.05/06/2025 रोजी प्राप्त़ झालेल्या, छावा कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य यांचे तक्रार अर्जा वरून (परिशिष्ट-10) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 33 अ नुसार पुढील प्रमाणे कार्यवाही केलेली आहे.
1) उक्त खरेदीखतामध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काबाबत वसुलीच्या अनुषंगाने मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी दि.12/06/2025 रोजी सदरचा दस्त तपासणीस घेतला (परिशिष्ट-11) व पुढे दि.23/06/2025 रोजीच्या पत्रान्वये खरेदीखतासोबत जोडलेल्या मुखत्यारपत्रांमध्ये नमूद केलेल्या विकसनकरारनाम्याच्या अनुषंगाने सदर करारनाम्याच्या प्रती व त्यामधील मोबदल्याची रक्कम कळविण्याबाबत कुलमुखत्यारपत्ररधारक श्रीमती शितल तेजवानी यांना निर्देश पत्र देण्यात आले. (परिशिष्ट-12) खरेदीखत आणि त्यासोबतच्या 89 कुलमुखत्यारपत्रांच्या मुद्रांक शुल्क प्रयोजनासाठी वर्गीकरणाची आणि मूल्यांकनाची कार्यवाही मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती.
2) खरेदीखत दस्त क्र.9018/2025 बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी सदर दस्ताबाबत कमी पडलेले मुद्रांक शुल्क रू.20,99,99,500/- व मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेवर प्रतिमाह 1% प्रमाणे दंड आकारण्याची बाब नमूद करून दि.07/11/2025 व दि.10/11/2025 रोजी सदर खरेदीखतामधील लिहून घेणार – मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांना नोटीस निर्गमित केली आहे. (परिशिष्ट-13)
या प्रकरणी आतापर्यंत विभागाने केलेली कार्यवाही -
खरेदीखत दस्त क्रमांक 9018/2025 बाबत घडलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.06/11/2025 च्या आदेशानुसार श्री.आर.बी.तारू, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, हवेली क्र.4 पुणे शहर यांना निलंबित करण्यात आले आहे. (परिशिष्ट-14)
सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांना विभागाने दि.06/11/2025 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने खरेदीखत दस्त क्र.9018/2025 बाबत पोलीस ठाणे बावधन येथे FIR क्र.523/2025 अन्वये दि.06/11/2025 रोजी 1)शितल किंशनचंद तेजवानी 2)दिग्विजय अमरसिंह पाटील 3) रविंद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. (परिशिष्ट-15)
मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी नोदणीकृत खरेदीखत दस्त क्र.9018/2025 बाबत त्यांच्याकडील दि.05/06/2025 रोजी प्राप्त झालेल्या छावा कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य यांचे तक्रार अर्जा वरून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 33 अ नुसार पुढील प्रमाणे कार्यवाही केलेली आहे –
उक्त खरेदीखतामध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काबाबत वसूलीच्या अनुषंगाने मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी दि.12/06/2025 रोजी सदरचा दस्त तपासणीस घेतला व पुढे दि.23/06/2025 रोजीच्या पत्रान्वये खरेदीखतासोबत जोडलेल्या मुखत्यारपत्रांमध्ये नमूद केलेल्या विकसनकरारनाम्याच्या अनुषंगाने सदर करारनाम्याच्या प्रती व त्यामधील मोबदल्याची रक्कम कळविण्याबाबत कुलमुखत्यारपत्ररधारक श्रीमती शितल तेजवानी यांना निर्देश पत्र देण्यात आले. याबाबत 55 कुलमुखत्यारपत्रांच्या बाबतीत विकसन कराराच्या प्रती, मोबदल्याची रक्कम आणि प्रत्येक कुलमुखत्यारपत्रातील मिळकतीचे क्षेत्र किती आहे, याची माहिती सादर करण्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी दि.07/11/2025 रोजी पुन्हा नोटीस निर्गमीत केली आहे.
खरेदीखत दस्त क्र.9018/2025 बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांनी सदर दस्ताबाबत कमी पडलेले मुद्रांक शुल्क रू.20,99,99,500/- व मुद्रांक शुल्क फरकाच्या रकमेवर प्रतीमाह 1% प्रमाणे दंड आकारण्याची बाब नमूद करून दि.07/11/2025 व दि.10/11/2025 रोजी सदर खरेदीखतामधील लिहून घेणार – मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी तर्फे भागीदार श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांना नोटीस निर्गमित करण्यात आली आहे.
क) खरेदीखताच्या रद्दलेख नोंदणीच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही -
मे.अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी तर्फे श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील, यांनी दिनांक 07/11/2025 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली क्र.4 यांचे कार्यालयात खरेदीखत दस्त़ क्र.9018/2025 या दस्तऐवजाबाबतचा रददलेख दस्तऐवज नोंदणी करण्याच्या उददेशाने दाखविण्यात आला असता, त्यामध्ये सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली क्र.4 यांनी मे.अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी तर्फे श्री.दिग्विजय अमरसिंह पाटील यांना खालील त्रुटींची पुर्तता करण्याबाबत कळविले आहे -
रदद करण्यात येत असलेल्या खरेदीखत दस्त क्र.9018/2025 बाबत शासन अधिसुचना दिनांक.01/02/2024 नुसार मुद्रांक शुल्कातुन माफीचा दावा करून सदर खरेदीखत नोंदविण्यात आले होते. तथापी आता नोंदणी करावयाच्या रददलेखावरून उक्त़ खरेदीखत दस्त क्र.9018/2025 नुसार उद्देशित डेटा सेंटर उभारण्याचे प्रयोजन रदद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वप्रथम उक्त अधिसुचनेतील शर्त क्र.6 नुसार खरेदीखतास देय असलेले महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 25 ब (i) प्रमाणे 5 टक्के + स्थानिक संस्था कर 1% + मेट्रो कर 1 % प्रमाणे एकूण 7 % दराने मुद्रांक शुल्क़ व त्यावरील दंड भरणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे खरेदीखत दस्त क्र.9018/2025 मध्ये कमी पडलेले मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर, यांचे कडे शासनजमा करून उक्त दस्त योग्य मुद्रांकित (Duly Stamped) करून घेणे आवश्यक राहील.
उक्त नमूद रद्दलेख पत्राद्वारे खरेदीखत दस्त क्र.9018/2025 रद्द करण्याचा उद्देश असल्यामुळे, सदर दस्तास खरेदीखता प्रमाणे मिळकतीचे बाजारमूल्य़ व मोबदला यापैकी जास्त रकमेवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनु.25(ब) (i) प्रमाणे 5 टक्के + स्थानिक संस्था कर 1% + मेट्रो कर 1 % प्रमाणे एकूण 7 % दराने मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक राहील.
वरील बाबींची त्वरीत पुर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा असे सबंधित पक्षकारास सह दुय्यम निबंधक हवेली क्र.4 कार्यालयाकडून दि.07/11/2025 च्या पत्रांन्वये कळविण्यात आले आहे.
(परिशिष्ट -17)
प्रस्तावित शिफारसी –
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 9 अंतर्गत पारित शासन अधिसुचने नुसार मुद्रांक शुल्क माफी अनुज्ञेय असणाऱ्या दस्तांबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कडून उक्त अधिनियमाच्या कलम 31 नुसार अभिनिर्णय करून घेणे बंधनकारक करावे.
नोंदणी अधिनियम 1908 कलम 18 क मधील तरतूद लक्षात घेता स्थावर मिळकतींच्या दस्तांबाबत,सदरचा दस्त नोदंणीस सादर करण्याच्या दिनांकाच्या जास्तीत जास्त 1 महिना अगोदरचा 7/12, मालमत्ता पत्रक (मालकीहक्क सांगणारी सर्व पत्रके) दस्तांसोबत जोडणे आवश्यक करावे.
राज्यातील महसूल वसुलीच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या जिल्हयांमधील सह दुय्यम निबंधक पदांवर पात्र वरिष्ठ व अनुभवी सह दुय्यम निबंधक यांची नेमणूक करण्यात यावी व सदर पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
नोंदणी अधिनियम 1908 मधील दिनांक 28/04/2025 च्या सुधारणे नुसार कलम 18 अ समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचे उपकलम (1) चे खंड (ख) नुसार शासन व तत्सम प्राधिकरणाच्या मालकीच्या मिळकतींचे खरेदी-विक्री इत्यादी व्यवहाराचे दस्त नोंदणी न करण्याचे बंधन दुय्यम निबंधकांवर आहे. तथापि ही तरतूद केवळ ‘मालकी’ पुरती मर्यादित आहे. अद्यापी शासनाची ‘मालकी’ न लागलेल्या तथापि शासनाचा ताबा व / किंवा इतर हितसंबंध असलेल्या मिळकतींचेही दस्त नोंदणी न होण्याकरिता सदर अधिनियमात स्पष्ट तरतूद करणे आवश्यक वाटते.
शासकीय मालकीच्या जमिनी व अध्यापि मालकी न लागलेल्या तथापि इतर हक्कांमध्ये ताबा व / किंवा तत्सम हितसंबंध असल्यामुळे व्यवहारावर प्रतिबंध असलेल्या मिळकतीची यादी (जसे की गाव नमुना 1 क) संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांचे जिल्हयातील सह जिल्हा निबंधक यांना उपलब्ध करून द्याव्यात व सह जिल्हा निबंधक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधकांमार्फत त्या सर्व मिळकतींचा समावेश आय-सरिता प्रणालीतील निगेटिव्ह प्रॉपर्टी लिस्ट मध्ये करून घ्यावा.
उपरोक्त प्रमाणे आज दि.17/11/2025 रोजी उपरोक्त अहवाल माननीय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना सादर करण्यात येत आहे.
श्रीम.अनुजा कुलकर्णी श्री.संजय पाटील
सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक
(सदस्य) (सदस्य)
श्री.उदयराज चव्हाण श्री.धर्मदेव माईनकर
नोंदणी उपमहानिरीक्षक (मु.) नोंदणी उपमहानिरीक्षक व
(सदस्य) मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग पुणे
(सदस्य)
श्री.राजेंद्र मुठे
सह नोंदणी महानिरीक्षक
महाराष्ट्र राज्य पुणे
(अध्यक्ष)
श्री. राजेंद्र मुठे
सह नोंदणी महानिरीक्षक तथा
मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय),
महाराष्ट्र राज्य पुणे
दि.17/11/2025
प्रति,
मा.नोंदणी महानिरीक्षक व
मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य
पुणे
विषय - मौजे मुंढवा ता.पुणे शहर, जि.पुणे येथील सर्वे नं.88 मधील जमीन खरेदीच्या
दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत नियुक्त चौकशी समितीचा अहवाल सादर
करणेबाबत.
संदर्भ - नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र, राज्य पुणे यांचे दिनांक
06/11/2025 रोजीचे आदेश.
महोदय,
उपरोक्त़ विषयी या विभागाच्या स्तरावर सविस्तर चौकशी करण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक यांचे अध्यक्षतेखाली संदर्भित आदेशान्वये समिती नियुक्त केली आहे. सदर समितीची चौकशी पूर्ण होवून समितीचा अहवाल सोबत सादर करीत आहोत.
सोबत :- अहवाल व
परिशिष्टे 1 ते 17
आपला विश्वासू,
(राजेंद्र मुठे)
सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय)
महाराष्ट्र राज्य़, पुणे
