विश्वासघात आणि अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे ती नेहमी मानसिकदृष्ट्या खचलेली आणि एकटी असायची. तिचे वडील कामासाठी बाहेर असायचे, भाऊ कॉलेजला आणि आई कामात व्यस्त असल्यामुळे तिला नेहमी उपेक्षित वाटायचं. मुलीच्या याच मानसिक अवस्थेचा फायदा आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) याने घेतला.
advertisement
मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली होती. भावनिक आधार देण्याच्या नावाखाली त्याने तिच्या आईच्या मोबाईलवरून तिला प्रेमाचे संदेश पाठवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचाराला सुरुवात केली. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा आरोपी तिच्या घरी जाऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा. गेल्या दोन वर्षांपासून चाललेला हा गंभीर प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता.
काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उजेडात आला.
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
याप्रकरणी आरोपी अमोल भोसले याच्यावर भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिरो क्रमांकाने नोंदवलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. घारगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
