अकोल्यातील अकोट या ठिकाणी बैलांप्रमाणे गाढवाची पूजा करून पोळा साजरा केला जातो. पोळा हा सण शेतकरी बैलांबद्दल असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. मात्र अकोल्यातील अकोटमध्ये गाढवांचा पोळा साजरा केला जातो. गाढवांप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या गावात ही प्रथा सुरू झाली. येथील भोई समाज हा या दिवशी गाढवांची पूजा करतो.
advertisement
असा साजरा होतो गाढवांचा पोळा
पोळ्याच्या दिवशी गाढवांना आंघोळ घातली जाते. त्याला बैलाप्रमाणे सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाने रंगविले जाते. संध्याकाळी सर्व गाढवांना एका ठिकाणी उभे करून त्यांची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. घरात बनविलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो. गाढवांना ठोंबरा (भिजवून ठेवलेल्या ज्वारीच्या कणकीचा गोळा) खाऊ घातला जातो. पुरुषांप्रमाणेच घरातील गृहिणी देखील आपल्या घरच्या गाढवाची भक्तिभावाने पूजा करतात.