रत्नागिरी: महापालिका निवडणुकीचा धुरळा बसल्यानंतर आता राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आाहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी एकत्र लढत आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाला जबरदस्त कलाटणी मिळाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात छुपी युती झाली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
दापोली तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारांची केलेली विभागणी ही केवळ योगायोग नसून, पूर्वनियोजित रणनिती असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. हर्णे आणि पालगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, केळशी आणि कोळवंद्रे येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार, तर जालगाव आणि दाभोळमध्ये भाजपचे उमेदवार उभे राहिल्याने “एकमेकांच्या विरोधात नाही, तर एकमेकांसाठीच ही लढत?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मात्र वेगळ्याच आक्रमक भूमिकेत आहे. भाजपशी काडीमोड घेत स्वबळाचा नारा देत शिंदे शिवसेनेनं सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, “वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरलो.”
तर, एकीकडे छुप्या युतीचे आरोप, दुसरीकडे स्वबळाची थेट लढाई आणि तिसरीकडे सेना विरुद्ध सेना संघर्ष
यामुळे दापोली तालुक्यातील पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक राज्यातील सर्वात चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
