केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडचा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने रायगडमध्ये आले. रायगडमध्ये आल्यानंतर अमित शाह यांनी पाचड गावात जात जिजामाता यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शाह हे रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर दाखल झाले. अमित शाह यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांना शिंदे शाही पगडी आणि कवड्याची माळ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. अमित शाह यांच्या आजच्या या कार्यक्रमात मोजक्याच नेत्यांची भाषणे झाली.
advertisement
अजितदादांना डावलले, एकनाथ शिंदेंना संधी....
रोपवे मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोबत रोप-वे प्रवास करत किल्ले रायगडाकडे मार्गस्थ झाले होते. अमित शाह यांच्या कार्यक्रम पुत्रिकेनुसार राज्य सरकारमधून फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे भाषण करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत नव्हती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली. तर, अजितदादा यांना मात्र संधी देण्यात आली नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या विशेष विनंतीची आता चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात शाह आणि फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर जाण्याआधी पुण्यात दाखल झाले. पुण्यात रात्री त्यांनी विश्रांती घेतली. याच दरम्यान रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत अमित शाह यांच्यासोबत राज्यातील राजकारण आणि विशेषत: पालकमंत्री पदाबाबतच्या तिढ्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
