आपली ड्युटी करून चार महिन्यांनी जेव्हा ती घरी जायला निघाली तेव्हा तिच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असतील याची उत्सुकता तिच्या मनात होती. त्यामुळे तिने सरप्राइज द्यायचं ठरवलं. चार महिन्यांनंतर घरी आल्यावर आई बाबांची रिअॅक्शन बघायची होती. आई बाबांना सांगितलं उद्या येणार आहे आणि आजच मी जाऊन त्यांना गोड सरप्राइज देणार आहे असं लक्ष्मीनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. लक्ष्मी चार महिन्यानंतर PSI च्या वेशात घरी पोहोचली. बहिणीं पहिली कडकडून मिठी मारली. त्यानंतर लक्ष्मी आईला बिलगली. मागून बापाच्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वाहात होतं. बाप पोरीचं हे वर्दीतलं रुप आल्या डोळ्यात साठवून घेत होता. आईच्या चेहऱ्यावर हसू तर डोळ्यात आनंदाश्रू होते. तर वडिलांच्या डोळ्यात लेकीनं बापाचं नाव मोठं केलं याचा आनंद होता. वडिलांचे डोळे फक्त पाण्याने भरलेले होते.
advertisement
अंगठ्याने डोळ्यातल्या पाण्याने गालावर आलेले ओघळ बाजूला करून त्यांनी लक्ष्मीला कडकडून मिठी मारली. डोळे पुसले आणि तिला घट्ट बिलगले. लेक चार महिन्यांनी परतली, वर्दीत पाहून डोळ्याचं पारणं फिटलं आणि कष्टाचं चीज झाल्याचे भाव त्यांच्या डोळ्यावर होते.
सोशल मीडियावर हा इमोशनल करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्रिष्णा तेलंग याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपल्या बहिणीचा इमोशनल क्षण कॅमेऱ्यात कैद केला. या वेळी संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आलं. सोशल मीडियावर देखील चाहते हा व्हिडीओ पाहून इमोशनल झाले आहेत.
ज्या वर्दीसाठी जीवाचं रान केलं ती मिळाली, ट्रेनिंग पूर्ण झालं आणि पोस्टिंगही झालं. त्यानंतर जेव्हा लेक चार महिन्यांनी घरी आई बाबांना भावंडांना भेटली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील भाव आणि या गोड सरप्राइजनंतर आलेलं हसू लाख मोलाचं होतं. ते कुठल्याही पैशात मोजता येणारं नव्हतं. इमोशनल करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
लक्ष्मीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तिचे वडील राजेश तेलंग हे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग मजूर म्हणून काम करतात, तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढते. दिवसाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आई-वडिलांना प्रचंड कष्ट करावे लागतात. लक्ष्मीच्या या प्रवासात तिच्या कुटुंबाचा पाठिंबा मोलाचा ठरला. मजुरी करणाऱ्या बापाच्या कष्टाचे आणि आईच्या त्यागाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. मारुतीनगर परिसरात लक्ष्मीच्या या यशाचे जोरदार कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
