नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेख अकील शेख गफूर (५५, रा. यास्मिननगर, गल्ली क्रमांक २) असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास गुन्हे शाखेचे कर्मचारी मंगेश लोखंडे आणि सतीश देशमुख हे अवैध दारु व्यावसाय प्रकरणी अकीलच्या घरी धाड टाकण्यासाठी गेले होते. पोलीस घरात शिरल्याने शेख अकीलने त्यांना विरोध केला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी शेख अकीलने अचानक धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापून घेतला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अकीलला पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला.
advertisement
या घटनेनंतर शेख अकील यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "शेख अकीलने मागील तीन महिन्यांपासून अवैध दारूचा व्यवसाय बंद केला असून तो सध्या रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी घरात शिरून त्याला मारहाण केली, त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले," असा दावा नातेवाइकांनी केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
दुसरीकडे, पोलीस सूत्रांनुसार शेख अकील याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तो घरात अवैध दारु व्यवसाय चालवतो, असा संशय पोलिसांना होता. याच प्रकरणी धाड टाकण्यासाठी पोलीस पथक अकीलच्या घरी गेलं होतं. मात्र यावेळी पोलिसांना पाहून कारवाईच्या भीतीने अकीलने स्वत:चा गळा कापला. शेख अकील सध्या बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
