या पुरातन विहिरीचे वैशिष्ट्ये काय?
दर्यापूर तालुक्यातील महिमापुर या गावाच्या मधात ही पायरी विहीर आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम मध्यप्रदेशमध्ये आढळणाऱ्या तांबूस रंगाच्या दगडाने केले आहे. ही विहीर आकाराने चौकोनी असून ऐंशी फूट खोल आहे. या विहिरीची रुंदी जवळपास 40 मीटर इतकी आहे. या विहिरीच्या प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन आकर्षक अशी फुले आहेत. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांती घेण्यासाठी काही टप्पे सुद्धा या विहिरीमध्ये देण्यात आले आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी आपल्याला फिरता येते.
advertisement
विहिरीच्या आतमध्ये खोल्या
या विहिरीच्या बांधकामात तांबूस रंगाचा दगड तर आहेच, पण त्याचबरोबर काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्यप्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आला. या विहिरीमध्ये खोल्या आहेत. दोन छोट्या खोल्या आणि एक मोठी खोली असल्याचे आजही तिथे बघायला मिळते. त्या खोलीमधून बाहेर पडण्यासाठी पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. ही विहीर पूर्णतः फिरता यावी यासाठी प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आणि बसायला जागा करण्यात आलेली आहे.
800 ते 900 वर्षे पुरातन विहीर
इतिहास अभ्यासकांच्या मते, महिमापुर येथील विहीर 800 ते 900 वर्षे जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही सात मजली विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. यादवांच्या काळात देवगिरी ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूरपर्यंत बारा विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापुर येथील पायरी विहीर असावी, असे इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. संतोष बनसोडे सांगतात.
विहिरीत सापडल्या देवाच्या मूर्ती
दिसायला अतिशय आकर्षक असलेल्या या विहिरीला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या विहिरीमध्ये अनेक साहित्य सुद्धा सापडले आहे. देवाच्या मूर्ती, नंदी आणि असे काही आणखी साहित्य गावकऱ्यांनी काढून मंदिरामध्ये ठेवले आहे. या विहिरीमध्ये महिमा मातेचे मंदिर असल्याचे देखील नागरिक सांगतात. आता ती महिमा मातेची मूर्ती बाहेर काढून मंदिर बांधण्याचे काम त्या ठिकाणी सुरू आहे. ही विहीर टिकवून ठेवण्यासाठी गावकरी प्रयत्न करीत आहेत.