विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी महालक्ष्मी मंदिर सिद्धपिठ हे सध्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय सुद्धा आहे.
advertisement
तेथील आर्ट गॅलरीबाबत जाणून घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधीने तेथील शिक्षकांसोबत संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, याठिकाणी ही शाळा 2023 पासून सुरू झाली आहे. आमच्याकडे 6 ते 18 वयोगटातील 50 मुलं आहेत. ते मतिमंद असल्याने त्यांच्या भविष्यातील विचार करून त्यांना विविध आर्ट शिकवले जातात. त्यामध्ये मातीच्या वस्तू बनविणे. पेंटिंग तयार करणे, मूर्तीला कलर करणे अशाप्रकारचे शिकवणी वर्ग घेतले जातात. मुलांना याठिकाणी सर्व सोयी मोफत असतात. त्यांचे राहणे खाण्याची सोय सुद्धा याच ठिकाणी केली जाते.
मुलांनी बनवलेल्या वस्तूंची आर्ट गॅलरी
आपण बघतो की, सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा कधी ना कधी खचून जातो. तर मग ही तर मतिमंद मुलं आहेत. समाजात ही मुलं आपल्यासारखी मिसळू शकत नाही. तर मग त्यांचे भविष्य पुढे कसे असणार? यावर एक मार्ग म्हणून या मुलांना विविध कला शिकवल्या जातात. प्रत्येक मुलात काही ना काही सुप्त गुण हा असतोच. त्यामाध्यमातून तो पुढे जाऊन स्वतःचा काही व्यवसाय उभा करू शकतो. या उद्देशाने मुलांना या सर्व कला याठिकाणी शिकवल्या जातात. त्याच मुलांच्या कामाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही इथे आर्ट गॅलरी तयार केली आहे.
यामध्ये मुलांनी बनवलेल्या मातीच्या वस्तू, अगरबत्ती, 12 बलुतेदार, लाकडाच्या पेंट केलेल्या मूर्ती, टेराकोटा मातीपासून बनवलेले भांडी, तीन प्रकारच्या पोस्टर पेंटिंग या आर्ट गॅलरीमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. या मुलांच्या कलेचे कौतुक व्हावे यासाठी हा उपक्रम आम्ही राबवित आहे. गजानन महाराजांच्या दर्शनाला दिवसाला हजारो भक्त याठिकाणी येतात. त्याच लोकांनी आमच्या या मुलांच्या आर्ट गॅलरीला सुद्धा भेट द्यावी. त्यांच्या गुणांचा गौरव करावा हीच आमची अपेक्षा आहे, असे शिक्षिका म्हणाल्या.





