सरकारच्या तिजोरीवर भार येत असल्याने जनतेला दिलासा देणाऱ्या योजना अडचणीत आल्या आहेत. गेली दोन वर्षे दिवाळी-दसराच्या सणानिमित्त गरीबांना दिला जाणारा 'आनंदाचा शिधा' यंदा रद्द करण्यात आला आहे. यासोबतच गरिबांसाठी सुरू असलेली 'शिवभोजन थाळी' योजना देखील अडचणीत सापडली आहे. शिवभोजन थाळी योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी स्पष्ट केले.
advertisement
छगन भुजबळ म्हणाले, "शिवभोजन योजनेला सध्या किमान 60 कोटी रुपयांची गरज आहे, मात्र सरकारने फक्त 20 कोटींचीच तरतूद केली आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद करावी लागणार असून, थाळ्यांची संख्या देखील कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ यांनी योजनेतील गैरव्यवहाराचाही उल्लेख केला. "एका शिवभोजन थाळी केंद्रात तर सिमेंटची पोती ठेवून शिवभोजन चालवलं जात होतं. अशा केंद्रांवर कारवाई करून ती बंद केली जातील," असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या आर्थिक स्थितीत नवीन शिवभोजन केंद्रांना मंजुरी देणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेमुळे योजनांवर गडांतर?
भुजबळ यांनी सरकारच्या इतर योजनांविषयीही भाष्य केलं. "'लाडकी बहीण' योजना गरजेची असून ती सुरू ठेवली जाईल. मात्र यामुळे तिजोरीवर ताण आला आहे. सरकारचं उत्पन्न वाढेपर्यंत खर्चावर मर्यादा आणावी लागेल," अशी कबुली त्यांनी दिली.
दरम्यान, 'लाडकी बहीण योजने'साठी लागणाऱ्या निधीवरून महायुतीमध्ये वादावादी सुरू आहेत. या योजनेसाठीचा निधी आपल्या खात्यातून वळता केला जात असल्याची तक्रार याआधीच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली होती. तर, विरोधकांनीदेखील या योजनेच्या निधी वरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आता मात्र, गरिबांच्या पोटासाठी असणाऱ्या दोन योजनांवर गडांतर आल्याने लाडकी बहीण योजनेच्या निधीचा मुद्दा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.