अनगर नगर परिषदेच्या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. नगराध्यक्ष पदासाठी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागल्याचे समोर आल्यानंतर या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष गेले. नगरपंचायत अध्यक्षपदासह सगळ्याच जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर येथील राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाची आणि दहशतीची चर्चा रंगली होती.
सध्या भाजपात असलेल्या राजन पाटील यांचे अनगरवर एकहाती वर्चस्व आहे. नगरपंचायतीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षणात अर्ज दाखल करावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली. भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे आणि सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज केला होता. छाननीत उज्वला थिटे यांच्या अर्जात सूचकाची सही नसल्याच्या कारणाने अर्ज बाद करण्यात आला. तर, सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतरच्या मिरवणुकीत राजन पाटील यांच्या मुलाने अजित पवारांना शड्डू ठोकत चॅलेंज केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला होता.
advertisement
निवडणूक प्रक्रियेला स्थगिती...
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले आहेत. आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
पुन्हा मतदान होणार की बिनविरोध?
समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपील दाखल होती आणि न्यायालयाने 23 तारखेपर्यंत निकाल दिलेत त्यांना आधीच प्रक्रिया राहणार आहेत. मात्र अनगरचा न्यायालयात निकाल 25 ला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगाला अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे कळवले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगतर्फे बिनविरोधाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुधारीत निवडणूक कार्यक्रमात अनगरची पु्न्हा निवडणूक होणार नसल्याचे समोर आले आहे.
