दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणाची अखेरीस ५०० दिवसानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांचा निर्दोष सुटका करण्यात आली. राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे यांची पत्रकारांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. त्याावेळी, अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा तुम्ही म्हणाला होता की, सत्य काय आणि खोटं काय समोर येईल, असं पत्रकारांनी अण्णा हजारेंना विचारलं असता, अण्णा म्हणाले की, "न्यायव्यवस्थेनं निर्णय दिला असता तर मी म्हटलं नसतं, कारण तोपर्यंत न्यायालयाने निर्णय दिला नव्हता. न्यायालयाने जो निर्णय दिला तो मान्य करावं लागेल" असं अण्णा म्हणाले.
advertisement
तसंच, "आपला देश हा न्यायव्यवस्थेवर चालणार देश आहे. इतका मोठा देश आहे. इतक्या जाती, धर्म आहे, पण हा देश न्यायव्यवस्थेवर चालत आहे. न्यायव्यवस्था नसती तर अराजकता माजली असती, त्यामुळे प्रत्येकाने न्यायालयीन निर्णयावर विश्वास ठेवला पाहिजे.
जेलमधून सुटकेनंतर केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, अण्णा म्हणाले की, "माझा आणि पक्षाचा काही संबंध नाही. मी राजकारणामध्ये पडत नाही. कोण कोणावर आरोप करतो हे महत्त्वाचे नाही. पक्षांतील वादात मी पडणार नाही, अरविंद केजरीवाल हे माझे जुने कार्यकर्ते आहे. त्यांनी समाजासाठी आणि देशाच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे. फक्त स्वता:चा पक्षाचा विचार करू नका, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आहुती दिली आहे, ते विसरू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार प्रकरणी चौकशीची मागणी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील अपघात प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत असताना यावरही अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. "देश लोकांच्या मतावर चालतो. लोकभावना असेल की चौकशी झाली पाहिजे, तर सरकारने ती करायलाच हवी, असे मत हजारे यांनी व्यक्त केले. सरकारने पारदर्शकतेने निर्णय घ्यावा", असंही त्यांनी सुचवलं.
