नाशिक हादरवून सोडणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खरातने स्वतःला खंडणीसाठी धमकावलं जात असल्याची तक्रार दिली होती, तोच आता महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात गजाआड झाला आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रकरणाचा तपास आता एसआयटीच्या (SIT) हाती असून, दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
advertisement
तक्रारदाराचा 'गेम' उलटला
या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे डिसेंबर महिन्यातच रोवली गेली होती. २९ डिसेंबर २०२५ रोजी कॅप्टन खरातने सिन्नरमधील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, पुण्याचा राजेंद्र जासूद आणि भायखळ्याचा दिनेश परब हे त्याला महिलांचे फोटो पाठवून ५ कोटी रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली, मात्र तपासाची चक्रे फिरताच खरात स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आला.
अशी झाली खरातला अटक...
२९ डिसेंबर २०२५ रोजी अशोक खरातने खंडणीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १२ मार्च २०२६ रोजी खरातचा शिपाई नीरज जाधव याच्याविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल झाला. एका युवतीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर १८ मार्च २०२६ रोजी नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली. खरातने ज्या महिलांच्या फोटोंचा उल्लेख खंडणीसाठी केला होता, त्याच महिलांचे शोषण त्याने स्वतः केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे.
अशोक खरात हा स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असे. ऑफिसचे ठिकाणी बोलावून फिर्यादी यांचा धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला आणि पाणी पिण्यास देऊन महिलांचे शोषण करत असे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले. खरातने केलेल्या लैंगिक शोषणाच्या ५८ व्हिडीओ क्लिप्स असल्याची माहिती समोर आली आहे.
