वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा फोटो ट्विट आणि फेसबुकवर शेअर करत नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नाशिकचे IG दत्तात्रय कराळे यांच्यासोबत कॅप्टन अशोक खरात याचा फोटो मला प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी खरातवर गुन्हा का दाखल झाला नाही? याचे उत्तर या फोटोत दडलेले असावे. नाशिक परिक्षेत्राचे IG स्वतः कराळे असल्याने खरातला पाठीशी घातले गेले, अशी माहिती मला फोनवरून मिळाली आहे."
advertisement
देसाई यांनी पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, महिलांबाबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असे पाठीशी कसे घालू शकतात? हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पोलीस प्रशासनात खळबळ
अशोक खरात यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाले होते, मात्र त्यावर कारवाई का झाली नाही, याबाबत आता संशयाचे धुके गडद झाले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबतचा फोटो समोर आल्याने 'वरदहस्त' कोणाचा, अशी चर्चा नाशिक विभागात सुरू झाली आहे. या प्रकरणाने पोलीस दलाची प्रतिमा मलिण होत असल्याचा आरोपही होत आहे. अद्याप यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
