20 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, सागरसोबत तिची ओळख प्रेमात बदलली. प्रेमाच्या नावाखाली सागरने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यांपूर्वी ती गर्भवती झाल्यानंतर सागरने अचानक लग्नास नकार दिला. "तू अनुसूचित जातीची आहेस, घरच्यांना हे मान्य होणार नाही," असे सांगून त्याने तिच्याशी संबंध तोडले. एवढंच नव्हे तर मी आत्महत्या करतो अशी धमकी देऊन तिच्यावर मानसिक ताण आणला.
advertisement
दरम्यान रविवारी तब्येत बिघडल्याने तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तरीदेखील सागरने तिच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. शेवटी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत तरुणीने छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सागरला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना फक्त एका तरुणीच्या आयुष्याशी खेळणारी नाही, तर समाजातील जातीभेदाची खोलवर रुजलेली मानसिकता दाखवणारी आहे. प्रेमात समानतेचा दावा करणाऱ्या समाजात अजूनही जात हा शब्द अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. न्याय मिळवण्यासाठी एका तरुणीला पोलिसांकडे धाव घ्यावी लागणे ही आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.