शुक्रवारी शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकांसह रेल्वेस्टेशन आणि खासगी ट्रॅव्हल्सचे थांबे प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामंडळाने ही विशेष सोय केली असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुणे मार्ग हा संभाजीनगर आगारासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग असल्याने प्रवाशांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत.
advertisement
यामध्ये 40 ई-बस, तर 15 नियमित आणि 20 जादा अशा एकूण 35 साध्या एस.टी. बस पुण्याला धावत आहेत. दरम्यान, नागपूरसाठी 15, अमरावतीसाठी 2, अकोल्यासाठी 4, तसेच जळगाव आणि भुसावळसाठी प्रत्येकी 5 बस सोडण्यात आल्या आहेत. यवतमाळ, उमरखेड, पुसद यांसारख्या मार्गांवरही प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त बसेस पाठवल्या जात असल्याचे महामंडळाने सांगितले.
खासगी ट्रॅव्हल्सचीही बुकिंग पूर्ण भरली असून, सीट न मिळाल्याने अनेक प्रवाशांनी टॅक्सी शेअरिंगच्या पद्धतीने पुण्याकडे निघण्याचा पर्याय स्वीकारला आहे.संभाजीनगर ते पुणे मार्गावर सध्या प्रवासी गर्दी वाढली असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
