डॉ. अमोल पाटील हे सरोगेट मदर आणि स्त्रीबीज मिळवून देणारे एजंट म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक आरोप त्यांच्यावर आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट बदलापूर इथून चालवलं जात होतं. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे स्त्रीबीज अवैध मार्गाने विकले जात असल्याचा संशय आहे.
गरजू महिलांना मोठ्या रकमेचं आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढले जात होतं. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने सुलक्षणा गाडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित एजंट्सची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. हे रॅकेट केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरते मर्यादित नसून, याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले असण्याचा संशय आहे. परदेशातील ग्राहकांना ही स्त्रीबीजे लाखो रुपयांना विकली जात असावीत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणात डॉ. अमोल पाटील यांच्या अटकेनंतर नाशिकमधील त्यांच्या मालती आयव्हीएफ सेंटरवर आता टांगती तलवार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या केंद्रातील सर्व कागदपत्रे, रुग्णांच्या नोंदी आणि स्त्रीबीज संकलनाची प्रक्रिया कायदेशीर आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
