बदलापूर : बदलापूरच्या शाळेमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले असतानाच आता आरोपी अक्षय शिंदेबाबत रोजच धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अक्षय शिंदेच्या आईने पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा असं करू शकत नाही, त्याला मारून जबरदस्तीने या गोष्टी वदवून घेतल्या गेल्याचं अक्षयची आई म्हणाली आहे. तसंच अक्षयने गुन्हा केला असेल तर त्याला माझ्यासमोर फाशी द्या, असंही अक्षयची आई म्हणाली आहे.
advertisement
दोन बायका सोडून गेल्या
दरम्यान अक्षय शिंदेला त्याच्या दोन बायका सोडून गेल्या आहेत, तसंच 6 महिन्यांपूर्वी त्याचं तिसरं लग्न झालं आहेत, तिला पाचवा महिना सुरू आहे, असं अक्षय शिंदेच्या आईने सांगितलं. त्याची आधी दोन लग्न झाली होती, पण या दोन्ही मुली राहिल्या नाहीत. नवरा आवडत नाही, म्हणून आधीच्या दोन्ही मुली सोडून गेल्या, असं अक्षयच्या आईने सांगितलं आहे.
आमच्या घरावरही हल्ला केला गेला. आम्हाला मारहाण केली गेली, आमच्या घरातील भांडीकुंडी फोडली गेली. कुणीही आमच्या मदतीला आलं नाही. आता आम्ही आमच्या घरात राहू शकत नाही. आता आम्ही कल्याण स्टेशनवर राहत असल्याची प्रतिक्रिया अक्षयच्या आईने दिली आहे.
दुसरीकडे बदलापूरच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही पहिल्यांदाच समोर आल्या आहेत. 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्टदरम्यान शाळेत नेमकं काय झालं? याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली आहे. पहिल्या मुलीने घरी दादा हात लावतो, असं सांगितलं. त्यानंतर मुलीचे पालक शाळेत आले. तेव्हा आम्ही मुलीला नेमका कोणता दादा ते विचारलं पण तिला उत्तर देता आलं नाही. दुसऱ्या मुलीचे पालक पोलीस आणि मीडियाला घेऊन आले, असं मुख्याध्यापिकांनी सांगितलं आहे. पहिल्या मुलीसोबत जे घडलं ते आपण मॅनेजमेंटला सांगितल्याचंही मुख्याध्यापिका म्हणाल्या आहेत. मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतंय. असं नाही व्हायला पाहिजे होतं. 30 वर्ष माझी सर्व्हिस झाली असं कधीच घडलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिकांनी दिली आहे.
