सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बिनविरोध निवडणुकीच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवाराचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पहिल्यांदाच असं घडलं आहे, ऐन निवडणुकीत भाजपचा उमेदवार खुनाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत गेला आहे.
सोलापूरमध्ये शुक्रवारी जोशी गल्ली येथे भाजपचे दोन गटात मोठे वाद झाला होता. या वादातून मनसे पदाधिकारी आणि युवासेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली होती. शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. या प्रकारणी सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात 15 आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.
advertisement
आज सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदांडाधिकारी श्रीमती एम. पी. मर्ढेकर यांच्या न्यायालयात हजर केलं असता पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात ३ आरोपीना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या तीन आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाविकास आघाडीतील नेते काळ्याफिती लावून करणार निदर्शनं
दरम्यान, मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसह पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं रविवारी महाविकास आघाडीतील नेते काळ्याफिती लावून निदर्शनं करणार आहे. यावेळी प्रणिती शिंदे यांनी या हत्ये प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली.
"सोलापूरमध्ये कधीच असा प्रकार घडला नाही. सोलापूरला काळिमा फासणारी घटना भाजपने केली आहे. राजकीय वादातून सोलापुरात बाळासाहेब सरवदे तरुणाची हत्या झाली आहे. कायदा आणि सुवव्यस्था कोलमडली आहे. पोलीस आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात भारतीय जनत पार्टीच्या दबाबाखाली काम करत आहे असं दिसून येत आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद यानंतर आता लोकांचं रक्त सांडवत आहे. केवळ बिनविरोध निवडणूक करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. सत्तेचा माज आणि सत्तेची लालच या लोकांना आली आहे' अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली.
