राष्ट्रवादीतील दोन्ही गटात संघर्ष सुरू असताना आता शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. बारामतीतून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून राजकीय कारणांमुळे दोन गटांत विभागलेलं पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबाची एक महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात पार पडणार असून, या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला हजेरी लावणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच त्या अशा प्रकारे शरद पवार यांच्यासोबत एकाच बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीमुळे पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद मिटून पुन्हा एकजूट होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
कोण कोण असणार बैठकीला?
विद्या प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या बैठकीला पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामध्ये स्वत: शरद पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार, तसेच युगेंद्र पवार आणि रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांनी अशाप्रकारे बैठक बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
