आरोपी पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी संबंधित सराफा व्यावसायिकाला रात्रभर एका दुसऱ्या लॉजवर डांबून ठेवलं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सराफा व्यापाऱ्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीच अशाप्रकारे लूट केल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गजानन क्षीरसागर असं आरोपी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे 24 नोव्हेंबर रोजी बीडला आले होते. रात्री उशीर झाल्याने ते बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. लॉजवर मुक्कामी असताना अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले.
advertisement
पोलिसांनी जैन यांच्याकडे असलेले सोने आणि मोबाईल ताब्यात घेऊन संपर्क बंद केला. दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली. पण जैन यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे आरोपी पोलिसांनी मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले. ते चार लाख रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली. रात्रभर दुसऱ्या लॉजवर नेऊन डांबलं. पहाटेच्या वेळी आरोपींनी उर्वरित तीन लाख रुपये सकाळी बारा वाजेपर्यंत आणून दे, असे म्हणून सोडून दिलं. यानंतर जैन हे तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे सराफा असोसिएशनने केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामधील सत्य काय ते लवकरच समोर येईल.
