बीडमध्ये घटनास्थळी तणाव वाढत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मोठ्या संख्येने पथक तैनात केले. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असली तरी सकाळपासूनच परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. मतदानावर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
गेवराईत सध्या तणावाचे वातावरण
advertisement
बीडच्या गेवराई येथे नगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रिया दरम्यान दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. गेवराई शहरातील मोंढा भागात असलेल्या मतदान केंद्राबाहेर पवार व पंडित गट समोरासमोर आले. यामध्ये मारहाणीची देखील घटना घडली. त्यानंतर गेवराई येथील माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर उभा असलेल्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत जमाव पांगवला असला तरी गेवराईत सध्या तणावाचे वातावरण आहे.
मतदान केंद्रावर मोठा राडा
गेवराईच्या मोंढा भागातील मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील मोंढा भागातील मतदान केंद्राबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्का-बुक्की आणि शिवीगाळ झाली. याच दरम्यान काही अज्ञात तरुणांनी रस्त्यावर उभी असलेल्या वाहनांची तोडफोड केली. दोन-तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी देखील तैनात
या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची (SRPF) एक अतिरिक्त तुकडी देखील तैनात करण्यात आली असून पोलीस अधीक्षक नवनीतकावत यांनी देखील या ठिकाणी भेट देत माहिती घेतली तसेच गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात तक्रार न झाल्यास आम्ही स्वतःहून गुन्हा दाखल करून कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे.
