गोपाल भागवत जाधव (२६, रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते माऊली अॅग्रो एजन्सी नावाचे कृषी साहित्याचे दुकान चालवतात. १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ते आपल्या दुकानासमोर खुर्चीवर बसले असताना जयपाल अशोक माने व त्याचा साथीदार निशांत विष्णू जागिर हे दोघे तेथे आले. त्यावेळी माने याने कपड्यात लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव यांच्या मानेवर हल्ला केला.
advertisement
जाधव यांनी डावा हात वर केल्याने कत्तीचे वार बरगड्यांवर व हातावर बसले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी कसाबसा जीव वाचवत पळ काढला.
दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत 'आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय राहणार नाही, तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. हा हल्ला दीड वर्षापूर्वीच्या जुन्या वादातून केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी जयपाल अशोक माने व निशांत विष्णू जागिर या दोघांविरुद्ध जीव घेण्याचा प्रयत्न व धमकी यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप हे करत आहेत.
घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
व्यापाऱ्याला कत्तीने मारहाण करतानाचा थरार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात आरोपी हा दुकानाबाहेर बसलेल्या व्यापाऱ्यावर अचानक येऊन कसा हल्ला करतो हे स्पष्ट दिसत आहे. १० ते १५ सेकंदांतच त्याने हा जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.