गंडाळवाडी येथील ३४ वर्षीय संजय शामराव पवार हे विवाहासाठी स्थळ शोधत होते. याचाच गैरफायदा घेत दत्ता पवार (रा. सुपा) व पठाण (रा. चोभा निमगाव) या दोन मध्यस्थांनी त्यांना एका मुलीचे स्थळ सुचवले. पंढरपूर येथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी मुलीची कथित मावशी व एका महिला एजंटने विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी केली.
advertisement
Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल? नाशिकच्या तिघांसोबत भयंकर घडलं, 17700000 रुपयांना गंडा!
मध्यस्थांच्या सांगण्यावरून संजय पवार यांनी चार लाख रुपये रोख दिले. याशिवाय लग्नासाठी दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही खरेदी करण्यात आले. १० डिसेंबर रोजी पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर गावी धार्मिक विधी पार पाडत विवाहाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
लग्नानंतर नवरी रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव, ता. वैजापूर) हिने सुरुवातीचे पाच दिवस सासरी नीट वागणूक दिली. मात्र, १५ डिसेंबरच्या रात्री कोणालाही काहीही न सांगता ती घरातून चार लाखांची रोकड व सोन्याचे दागिने घेऊन बेपत्ता झाली. सकाळी ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली; मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
संजय पवार यांनी मध्यस्थांना संपर्क साधला असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. १७ डिसेंबर रोजी मुलीची कथित मावशी व महिला एजंटने उलट धमकी देत, पुन्हा फोन केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा इशारा दिला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी दत्ता पंढरीनाथ पवार, पठाण, जयश्री रवी शिंदे, रुपाली बाळू दिशागंज व एका अनोळखी महिला एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ पुढील तपास करीत आहेत.






