गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील हरिलाल नाईक तांड्यावर नुकतेच एक भावनिक पुनर्भेट अनुभवायला मिळाली. प्रकाश जनार्दन जाधव (वय 47) हे तब्बल 32 वर्षांनंतर आपल्या गावी परतले. किशोरवयात घर सोडलेल्या या तरुणाचा जीवनप्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. एका अपघातानंतर हरवलेली स्मृती परत आली आणि त्यांना आपल्या गावाची, आई-वडिलांची व लहानपणीच्या आठवणींची ओढ पुन्हा जागी झाली.
advertisement
बीड हादरलं! मुलगी आजारी अन् पतीची ‘ती’ डिमांड, विवाहितेचं टोकाचं पाऊल, सगळंच संपलं!
नेमकं घडलं काय?
1972 च्या दुष्काळात प्रकाश यांचे वडील जनार्दन जाधव हे उदरनिर्वाहासाठी नाशकमध्ये गेले होते. तिकडे त्यांनी छोटंसं दुकान देखील सुरू केलं होतं. परंतु, परिस्थितीमुळे प्रकाश दहावीत असताना आई-वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही. त्यामुळे रागाच्या भरात प्रकाशने 16 व्या वर्षीच घर सोडलं. परंतु, शिक्षणाची आवड असल्याने हॉटेलमध्ये काम करून शिक्षण सुरूच ठेवलं.
चोरट्याच्या हल्ल्यात गेली स्मृती
घर सोडल्यानंतर काही काळ गेला आणि चोरट्यांच्या हल्ल्यात स्मृतीच गेली. त्यामुळे भूतकाळ आणि आई-वडील, गाव सगळंच विस्मृतीत गेलं. तेव्हा एका आश्रमात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. आयुष्याने प्रकाशला पुढे वेगवेगळ्या वळणांवर नेले आणि अखेरीस ते युरोपात पोहोचले.
जगभराचा प्रवास आणि तो अपघात
पुढे युरोपात गेल्यानंतर ते वेगवेगळ्या देशांत कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत फिरले. या काळात गाव, कुटुंब यांबाबत कोणत्याही आठवणी सोबत नव्हत्या. मात्र, डिसेंबर 2024 मध्ये माल्टा येथे झालेल्या अपघातामुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. उपचारांदरम्यान 32 वर्षांनी हळूहळू त्यांची स्मृती परत येऊ लागली. आई-वडील, बहिणी आणि गावाची चित्रे त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागली.
नातेवाईकांचा शोध
स्मृती परत आल्यानंतर प्रकाश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईकांचा शोध सुरू केला. अखेरीस चुलत भाऊ आणि शिक्षक सुभाष जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात त्यांना यश आले. व्हॉट्सअॅपवरील संवाद आणि छायाचित्रांमुळे ओळख पटली. त्यानंतर गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. तांड्यावर त्यांच्या आगमनावेळी जल्लोषाचे वातावरण होते.
भाषेचा विसर पण...
दीर्घकाळ परदेशात राहिल्यामुळे प्रकाश बंजारा भाषा विसरले असले तरी मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. परदेशात यश आणि संपत्ती मिळाली, तरीही मायभूमीची ओढ कायम राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुनरागमनाने गावकऱ्यांमध्येही आनंद आणि आश्चर्याची भावना आहे. त्यामुळे तांड्यावर आतषबाजी, पुष्पहार आणि आनंदाश्रूंनी वातावरण भारावून गेले.






