शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी अंभोरा-हिवरा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह दिसला. नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अंभोरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला होता आणि त्याच्या छातीत गोळी लागल्याची गंभीर जखम होती. मृतदेहापासून काही अंतरावर त्याची दुचाकी उभी होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मृतदेहाजवळच एक गावठी बनावटीची बंदूक आणि काडतूस पडलेले आढळून आले.
advertisement
आत्महत्या की घातपात, मृत्यूचं गूढ वाढलं
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर चव्हाण हा तरुण मिस्त्रीचं काम करत होता. त्याच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही गोळी कोणी झाडली? की त्याने स्वत: झाडून आत्महत्या केली? याबाबत गूढ वाढलं आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला गोड बोलून या निर्जन ठिकाणी बोलावले आणि गोळी झाडून त्याची हत्या केली का? असा संशयही आता व्यक्त केला जातोय. तसेच बंदूकीशी खेळताना अपघाताने गोळी सुटून त्याचा मृत्यू झाला का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मृत मयूर चव्हाण याच्याकडे हे गावठी पिस्तूल कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.