अयोध्या राहुल व्हरकटे असं हत्या झालेल्या २६ वर्षीय महिलेचं नाव आहे. ती होमगार्ड म्हणून काम करत होती. शिवाय ती पोलीस भरतीची देखील तयारी करत होती. तर वृंदावनी सतीश फरताळे असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. मयत आयोध्या आणि वृंदावनी दोघीही विवाहित आहेत. अयोध्याच्या पतीचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तेव्हापासून ती माहेरी गेवराई इथं वास्तव्याला होती. तिला एक मुलगा असून तो सासरी राहतो. काही दिवसांपूर्वी अयोध्याची वृदांवनीशी ओळख झाली होती.
advertisement
आरोपी वृंदावनी ही बीडमध्ये आपल्या तीन मुलांसह राहते. तिचा पती गावी असतो. तिचे बीडमधील एका तरुणासोबत अनैतिक प्रेम संबंध सुरू होते. ही बाब अयोध्याला माहीत होती. काही दिवसांपूर्वी अयोध्या हिचेही त्याच तरुणासोबत सूत जुळलं. आपल्या प्रियकरासोबत मैत्रिणीचेच प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती वृंदावनीला मिळाली. यानंतर दोघींमध्ये वाद होऊ लागले. यातून वृंदावनीने अयोध्याची हत्या करण्याच कट रचला.
घटनेच्या दिवशी १९ ऑगस्टला आरोपी वृंदावनीने होमगार्ड असलेल्या अयोध्याला आपल्या घरी बोलावलं. यावेळी वृंदावनीचे तिन्ही मुलं शाळेत गेली होती. अयोध्या घरी आल्यानंतर वृंदावनीने तिची हत्या केली. तसेच मुलं शाळेतून घरी यायच्या आधी तिने अयोध्याच्या मृतदेह एका मोठ्या बॉक्समध्ये भरला. यानंतर आपल्या १४ वर्षांच्या मुलाच्या मदतीने तो बॉक्स शहराबाहेर नेऊन टाकला.
या प्रकरणी अयोध्याच्या भावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता अयोध्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना वृंदावनीवर संशय बळावला. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, १९ तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही. शिवाय आरोपी महिला एक मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
