विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी नाना पटोले विजयी झाले. त्यानंतरच्या सहा महिन्यातच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाना पटोले विरोधकांना धोबीपछाड देऊन पुनरागमन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु महायुतीच्या समूह शक्तीपुढे नाना पटोले यांचा निभाव लागला नाही. खासदार प्रफुल पटेल, आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन अशा महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेसाठी ताकद लावली होती. या सगळ्यांच्या विरोधात नाना पटोले यांनी एकाकी लढत दिली. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली.
advertisement
जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान काँग्रेस खासदार पराभूत
दूध उत्पादक सहकारी संघ गटात काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा पराभव झाला. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे यांनी खासदार पडोळे यांचा पराभव केला. फुंडे यांच्याविरोधात खुद्द खासदार पडोळे मैदानात उतरल्याने निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. परंतु लक्षवेधी लढतीत फुंडे यांनी पडोळे यांना पाणी पाजले. सुनील फुंडे यांच्या सहकारातील अनुभवासमोर काँग्रेस कमी पडली. यापूर्वीही झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुनील फुंडे यांनी प्रशांत पडोळे यांचा पराभव केला होता. खासदार प्रशांत पडोळे यांचे वडील आणि दिवंगत नेते यादवराव पडोळे हे नाना पटोले, सुनील फुंडे यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात.
नाना पटोले यांचे सहकारी विरोधकांना मॅनेज?
आपण जिल्हा बँकेची निवडणूक लढणार, असे नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु मधल्या काळातील राजकीय घडामोडींमुळे नाना पटोले यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. शिवाय भविष्यातील संधी हेरून नाना पटोले यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी विरोधकांना मदत केली, असा आरोपही काँग्रेसमधील काही नेते खासगीत बोलताना करतात.