ही घटना भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे घडली आहे. नितेश हिवरकर (वय ३९, रा. सोनेगाव ठाणे, ता. पवनी, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. नितेश हिवरकर हा एका पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा प्रशिक्षक आहे. त्याच्याकडे अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश हिवरकरने प्रशिक्षणार्थी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. जेव्हा याबद्दल तरुणीने तिच्या मित्राला सांगितले, तेव्हा या मित्राने प्रशिक्षकाकडे जाब विचारला. त्यावर आरोपीने त्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली.
advertisement
याप्रकरणी तरुणीच्या मित्राने अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नितेश हिवरकरविरुद्ध भादंवि कलम ७५ (२), ३५१, ३५२ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१) (आर), (एस) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.