ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ भास्कर जाधवही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला क्षमतेनुसार संधी मिळाली नसल्याचे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी भाष्य केले.
मी 43 वर्ष राजकारणात पण...
advertisement
भास्कर जाधव यांनी म्हटले की, शिवसेनेने माझ्या क्षमतेनुसार संधी दिली नाही, असं मी म्हणालो नाही. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही. मी जे बोलतो ते सत्य असते. जो शब्द बोलतो, त्यावर मी ठाम असतो. पण, मी जे बोललो नाही. त्यावर बोललं पाहिजे. मागील काही दिवसांपासून मला विरोधी पक्ष नेतेपद हवंय म्हणून मी दबाव टाकत असल्याचे म्हटले जात आहे. मी राजकारणात 43 वर्षाच्या राजकीय जीवनात रडगाणे, नाटक केले नाही. जे असेल ते सत्य, मिळाले ते माझ्या नशिबाने नाही मिळाले माझ्या नशिबाने अशी माझी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
राजन साळवी हे पक्षातून गेले.जायचे तर जा अशी माझी भूमिका नाही. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्यासोबत थांबावे असे मला वाटते. पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत पक्ष प्रमुखांनी भाष्य केल्यानंतर आपण त्यावर बोलावं अशी माझी भूमिका नाही असेही त्यांनी म्हटले.
मी विरोधी पक्षनेतेपदासाठी दबाव टाकला नाही, नाटक केले नाही. आता माझ्या राजकीय आयुष्यात फार कमी वर्षे उरली आहेत. मात्र, निराधार चर्चा माझ्या जिव्हारी लागली असल्याचे भास्कर जाधवांनी सांगितले.
उद्धवसाहेबच बाळासाहेबांचे वारसदार....
भास्कर जाधव यांनी म्हटले की, महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की कोणालाही कोणाची गरज राहिलेली नाही. जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करु. शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. पण ते असतानाही कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा, नावाचा आणि निशाणीचा वारसदार नेमला. त्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागतोय. पण आम्हाला न्याय मिळत नाही, अशी खंतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
