भाईंदर: भाईंदर रेल्वे स्थानकात मराठी भाषेच्या वापरावरून संतापजनक प्रकार समोर आला असून, मराठी भाषेतून उद्घोषणा का केली जात नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला स्टेशन मास्तरने तब्बल तीन तास आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
advertisement
जिगर पाटील असे या तरुणाचे नाव असून, ३० डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत भाईंदर स्थानकात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनच उद्घोषणा सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने थेट स्टेशन मास्तर बिपीन सिंग यांची भेट घेत मराठी भाषेला डावलले जात असल्याबाबत विचारणा केली. मात्र, यावर स्टेशन मास्तरने “मराठी नहीं है तो क्या करें?” असे उद्धट आणि आक्षेपार्ह उत्तर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जिगर पाटील यांनी तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार वही मागितली असता स्टेशन मास्तर अधिकच संतप्त झाले. “रेल्वे पोलिसांना बोलवा, थांब तुला दाखवतो,” अशी धमकी देत त्यांनी जिगर पाटील यांना आपल्या दालनात डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतकेच नव्हे तर, विना तिकीट स्थानकात प्रवेश केल्याचा आरोप करत तिकीट तपासनीसाला बोलावून जिगर पाटील यांच्यावर २६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. “महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरणे गुन्हा आहे का?” असा संतप्त सवाल जिगर पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मराठी एकीकरण समितीची धडक...
या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमोद पाटें, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे आदींनी तातडीने स्थानकात धाव घेतली. त्यांनी स्टेशन मास्तरकडे जाब विचारत मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. तसेच डांबून ठेवण्यात आलेल्या जिगर पाटील यांची सुटका करण्यात आली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर सक्तीचा असताना अशा प्रकारचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला, असा थेट सवाल समितीने रेल्वे प्रशासनासमोर ठेवला आहे.
