महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांची निवड
भाजपकडून महापौरपदाची माळ आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आणि प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके यांच्या गळ्यात पडली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने नाशिकच्या पुढील महापौर म्हणून त्या विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनात्मक अनुभव, प्रशासनाची समज आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
उप महापौरपदी मच्छिंद्र सानप
उपमहापौरपदासाठी भाजपने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा केली आहे. महापालिकेतील पक्षीय समन्वय, तरुण नेतृत्वाला संधी आणि आगामी काळातील शहरविकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. महापालिकेतील सत्ताकेंद्रात नव्या पिढीला स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचेही यानिमित्ताने दिसून येत आहे.
शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी हालचाली
दरम्यान, उपमहापौरपदासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून प्रविण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या अर्जांना प्रत्यक्ष सत्तास्थापनेत कितपत स्थान मिळणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
याबाबत माहिती देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरास अनुभवी, सक्षम आणि जबाबदार नेतृत्वाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.”
