शिर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्यासाठी सकाळपासून लगबग सुरू होती. सत्तेत असलेल्या भाजपच्या उमेदवाराने चक्क अर्ज मागे घेतल्याचं पाहण्यास मिळालं. त्यामुळे शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अपक्ष उमेदवारासाठी चक्क भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिर्डीत प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनिषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गोंदकर यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराची निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी जुळवून हे राजकीय समीकरणं जुळवून आणलं असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वसाधारण जागेवर ओबीसी उमेदवारासाठी मराठा उमेदवाराने ही माघार घेतली आहे.
advertisement
भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे का घेतला?
शिर्डीमध्ये विषारी प्रचार होत होता. त्यामुळे आम्ही कृतीतून हे फोडून काढलं आहे. शिर्डीत प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनिषा शिवाजी गोंदकर आणि अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या आमच्याच उमेदवार होत्या. आता एकच अर्ज उरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या आदेशानुसार, एक नवीन आदर्श ठेवला. एका जागेवर ओपन जागा असलेल्या जागेवर पक्षनिष्ठा दाखवत आम्ही अर्ज मागे घेतला. त्यामुळे अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहे. महाराष्ट्रात अप्रचार सुरू आहे. तो हाणून पाडण्यासाठी आम्ही शिर्डीतून सुरुवात केली आहे, अशी प्रतिकिया सुजय विखे पाटील यांनी दिली.
हकालपट्टीनंतर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर
तर दुसरीकडे अर्ज माघारीच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळाला.
ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले. पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्ष म्हणून सुद्धा त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. पठारे यांच्यावर ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी AB फॉर्म चोरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अश्रू अनावर झाले होते.
.ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या होत्या. अखेरीस पठारे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला. पण नगरसेवकपदाचा अर्ज मात्र कायम ठेवला आहे. पक्षातून हकालपट्टीनंतरही नगरसेवक पदासाठी राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांचे पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम आहे.
