त्रिभाषा सक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राज्य सरकार मागील दाराने हिंदी सक्ती करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मागील काही दिवसांपासून विविध आंदोलने मराठी अभ्यास केंद्र आणि इतर संस्था, संघटना राजकीय पक्षांनी केली होती. रविवारी सरकारने काढलेला जीआर जाळून विरोध करण्यात आला. तर, मुंबईत 5 जुलै रोजी राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव यांनीदेखील सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. या मोर्चात विविध राजकीय पक्षदेखील सहभागी होणार होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषाबाबतचे तिन्ही जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले.
advertisement
भाजपकडून उद्धव यांना घेरण्याचा प्रयत्न...
भाजपकडून उद्धव यांनाच घेरण्याचा प्रयत्न होताना दिसून आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारत शिफारसी लागू केल्या आणि त्यानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले?
भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मी कोणताही शासन निर्णय (जीआर) काढला नसताना त्यांनी माझ्यावर खोटे आरोप सुरू केले आहेत,” अशी जोरदार टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव यांनी म्हटले की, “उच्च शिक्षणाच्या संदर्भात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तेव्हा उदय सामंत शिक्षणमंत्री होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची भूमिका काय असावी, यासाठी ही समिती तयार करण्यात आली होती.
या माशेलकर समितीने तयार केलेला अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी करावी की नाही, यासाठी माझ्या नेतृत्वात अभ्यासगटही तयार करण्यात आला होता. मात्र, "तेवढ्यात आमचं सरकार पाडण्यात आलं. आम्ही त्या शिफारशींचं एक पानही उघडून पाहिलं नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मी जीआर काढला म्हणता तर मग तीन वर्ष झोपा काढत होते का? तीन वर्ष कुणालाच कळलं नाही मी जीआर काढल्याचं. मीच माझ्या जीआरची होळी करेन? मी मराठी सक्तीची केली. ते मराठी नीट वाचा, समजून घ्या आणि मग बोला, टोलाही ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.