ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय दबदबा तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आगामी पालिका निवडणुकीत इथे सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही, ठाण्यात स्वबळावर सत्तेचे वेध
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही. या महापालिकेत भाजपने आपली राजकीय ताकद वाढवली आहे. त्यामुळेच भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडं मोठं संख्याबळ आहे. पण भाजपला या महापालिकेत स्वबळावर सत्तेचे वेध लागले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याविषयी भाजप चाचपणी करीत आहे. त्यामुळे या दोन्ही पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
सत्ताधारी पालिका निवडणुकीत आपसातच भिडणार
राज्यात भलेही भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असली तरी काही पालिका निवडणुकीत ते आपसातचं भिडणार आहे. कारण सत्ताधाऱ्यांना या पालिकेत स्वबळावर सत्तेचे वेध लागले आहेत. त्यामुळे मुंबईत जरी ते महायुती म्हणून लढणार असले तरी अन्य काही ठिकाणी त्यांच्यात सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.