सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडे आहे. आता त्यांच्या जिल्ह्यात पोलिसांकडून हिंदू समाजातील तरुणांवर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप आमदारांनी मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या प्रकरणांची माहिती समोर आणली आहे. पोलिसांकडून हिंदू तरुणांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
पालकमंत्रीच्याच जिल्ह्यात पोलिसांकडून नाहक त्रास?
भाजप आमदारांनी केलेल्या आरोपांनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलनात काही व्यक्तींनी कथितपणे आक्षेपार्ह घोषणा केल्या, मात्र पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेल्या हिंदू तरुणांवरच लाठीचार्ज केला. इतकेच नव्हे तर पतितपावन मंदिरात महाआरतीला शांततेत हजेरी लावणाऱ्या चार तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा उल्लेखही प्रस्तावात करण्यात आला.
भाटकरवाडा पेठकिल्ला परिसरात एक दुचाकी जाळून धार्मिक तेढ निर्माण करणारे पत्रक टाकण्यात आले. तपासात तक्रारदारच दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही स्थानिक हिंदू तरुणांना सतत पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी मांडण्यात आला. देवरुखमध्ये पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली देणाऱ्या काही तरुणांची खिल्ली नाविद कापडी नावाच्या व्यक्तीकडून उडवण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांनाही पोलिसांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय जिल्ह्यातील एका शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत राष्ट्रगीताऐवजी नमाज पठण सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना वेळेवर माहिती देण्यात आली, तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा ठपकाही आमदारांनी ठेवला.
या तक्रारींच्या माध्यमातून भाजप आमदारांनी थेट पोलीस यंत्रणेवरच नव्हे तर अप्रत्यक्षपणे राज्य सरकारातील सहयोगी मंत्री व यंत्रणांवरही उघड नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हे केवळ पोलिस कार्यशैलीच्या चर्चा मुळेच नव्हे, तर महायुतीतील अंतर्गत संघर्षाच्या पातळीवरही चर्चेचा विषय ठरत आहे.