मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपले सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडून एकही उमेदवार नसल्याचे सांगत किरीट सोमय्या यांनी ठाकरे बंधूना डिवचलं होतं. नील सोमय्या यांचा विजय सहज सोपा झाला असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता ठाकरे गटाने आता मोठा डाव खेळला आहे.
advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून, वॉर्ड क्रमांक १०७ मधून भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. नील सोमय्या यांनी २०१७ साली मुलुंडमधील वॉर्ड क्रमांक १०८ मधून पहिल्यांदा महापालिकेत प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवत स्थानिक राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. आता सलग दुसऱ्यांदा भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली. मात्र, या वेळेस नील सोमय्या हे शेजारच्या वॉर्डमधून उभे राहिले आहेत.
या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे निवडणुकीचं गणित पूर्णपणे बदललं आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या युतीनेही याच वॉर्डमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र, अर्ज बाद झाल्यामुळे हा पर्यायच बाद ठरला आणि नील सोमय्यांसमोर कोणताही थेट प्रतिस्पर्धी उरला नसल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजून खेळ संपला नसल्याचे सांगितले. किरीट सोमय्या हे आमचेच नाही तर महाराष्ट्राचे शत्रू, ते महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाकरे गटाची मोठी खेळी...
नील सोमय्या यांच्याविरोधात कोणताच सक्षम उमेदवार नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी करत ठाकरे बंधूंना डिवचलं होतं. या महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि महाविकास आघाडी संपली जाईल, असा दावाही सोमय्या यांनी केला होता. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. नील सोमय्या यांची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. किरीट सोमय्या हे
संजय राऊत यांनी सांगितले की, जागा वाटपाच्या वेळी आम्ही या जागेसाठी आग्रही होतो. मात्र, शरद पवार गटाने ही जागा मागून घेतली. मात्र, अर्ज पडताळणीत ही जागा बाद झाली. याच मतदारसंघात दगाफटका होऊ शकतो, या विचाराने कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यांना आता शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असून आम्ही सगळी ताकद त्यांच्या पाठिशी लावणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. नील सोमय्या यांचा विजय हा बिनविरोध होणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
२०१७ मध्ये काय होता निकाल?
नील सोमय्या हे २०१७ च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १०८ मधून विजयी झाले होते. सध्या लढवत असलेले १०८ वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. २०१७ मध्ये भाजपच्या स्मिता कांबळे यांना १०,५०५ मते मिळाली. तर, शिवसेनेच्या मालती शेट्टी यांना ५५१८ मते मिळाली होती. मनसेच्या हर्षला चव्हाण यांना २३२७ मते मिळाली. तर, काँग्रेसच्या माधुरी मिरेकर यांना ३७८५ मते मिळाली. अपक्ष उमेदवार वैशाली शाह यांना ४७०५ मते मिळाली होती.
आता ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गट-मनसे यांची मते जाधव यांच्याकडे वळणार आहेत. त्याशिवाय, या प्रभागात विरोधी मते जुळवण्यास जाधव यशस्वी झाल्यास सोमय्या यांच्यासमोरील आव्हान तगडे होणार आहे.
