मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत जाण्यास नकार दिला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी मनसेचे 'इंजिन' महत्त्वाचे ठरणार असल्याचे चिन्ह आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राज यांच्यासोबत युतीची गणितं आखली जात आहेत.
advertisement
मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे पानीपत झाले. तर, महायुतीला धमाकेदार विजय मिळाला. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले. तर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मतभेद विसरत एकत्र येण्यासाठी पावले उचलली. विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता.
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक असतानाही काँग्रेस अद्याप मनसेला सोबत घेण्यास तयार नाही. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली असता, मुंबईत मनसेविना मविआचा खेळ जुळून येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते. महापालिकेच्या निवडणुकीत काही हजार मतेदेखील निर्णायक ठरणार आहेत.
मनसेचे मुंबईत कार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने २८ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत ७ जागांवर विजय मिळाला. मात्र, त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती.
विधानसभा निवडणुकीनंतरच्या आकडेवारीने मुंबईतील 227 वॉर्डांपैकी तब्बल 22 प्रभागांमध्ये मनसेकडे निकाल फिरवण्याची ताकद असल्याचे दिसून आले. या ठिकाणची मनसेची मते मविआला मिळाल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडुप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्ती नगर, चांदीवली आणि माहीम या ठिकाणच्या काही प्रभागात महायुती आघाडीवर आहे. मात्र, मविआ आणि मनसेची मते एकत्रित केल्यास महायुतीला धक्का बसू शकतो. याचा अर्थ एकत्रित मते आल्यास मविआ-मनसे युतीला फायदा होऊ शकतो. यातील काही जागा शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
>> कोणत्या वॉर्डात मनसे ठरणार महत्त्वाची?
| विधानसभा मतदारसंघ | वॉर्ड क्रमांक | महायुती | महाविकास आघडी | मनसे |
| अणुशक्ती नगर | 125 | 12,980 | 10,446 | 5,196 |
| अणुशक्ती नगर | 126 | 11,847 | 10,446 | 3,106 |
| अणुशक्ती नगर | 124 | 11,159 | 11,061 | 2,208 |
| कलिना | 42 | 9,035 | 7,371 | 2,972 |
| गोरेगाव | 144 | 10,300 | 4,677 | 6,850 |
| गोरेगाव | 109 | 10,039 | 5,927 | 2,863 |
| घाटकोपर | 91 | 10,191 | 9,709 | 740 |
| घाटकोपर | 113 | 10,481 | 8,781 | 2,665 |
| घाटकोपर | 123 | 11,051 | 9,350 | 5,881 |
| घाटकोपर | 51 | 11,131 | 10,055 | 1,339 |
| घाटकोपर | 74 | 12,274 | 10,394 | 2,076 |
| चांदिवली | 61 | 11,267 | 11,111 | 1,166 |
| जोगेश्वरी | 39 | 6,987 | 6,985 | 1,181 |
| जोगेश्वरी | 127 | 9,988 | 7,269 | 4,339 |
| दिंडोशी | 146 | 6,345 | 4,618 | 4,949 |
| दिंडोशी | 148 | 6,672 | 4,632 | 4,446 |
| भांडुप | 53 | 7,542 | 7,502 | 727 |
| भांडुप | 88 | 9,933 | 8,294 | 3,011 |
| माहीम | 58 | 13,041 | 11,774 | 1,683 |
| माहीम | 161 | 17,575 | 15,199 | 3,897 |
| वर्सोवा | 192 | 9,399 | 6,146 | 6,392 |
| विले पार्ले | 190 | 9,196 | 7,324 | 7,115 |
महाविकास आघाडीत मनसेचा समावेश करण्यास काँग्रेसकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतील अल्पसंख्याक मतदारधारक असलेल्या काँग्रेसला मनसेसोबत जाणं राजकीयदृष्ट्या धोक्याचं वाटतंय. मात्र, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) मात्र मनसेसोबत आघाडी करण्यास इच्छुक दिसत आहेत. त्याशिवाय, डावेही या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
