मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून जवळपास 22 महापालिकेत भाजप महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे, राज्यातील बहुतांश महापालिकेत भाजप महायुतीचाच महापौर होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीतूनच विजयी नगरसेवकांपैकी कोण महापौर होणार हे समजणार आहे. कारण, ज्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर होईल, त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची लॉटरी लागणार आहे.
advertisement
कुठे निघणार आरक्षण?
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री नगर विकास महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 11 वाजल्यापासून काढण्यात येणार आहे.
कसे काढणार आरक्षण?
महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार आहे. जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होतं, ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि खुला वर्ग, त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असे आरक्षणाचे प्रवर्ग असणार आहेत. त्या महापालिकेमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे, ती चिठ्ठी बाजूला करुन उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या जातील, त्यानंतर पारदर्शक असणाऱ्या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील. त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे.
मुंबईत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यास मोठी उलथापालथ मुंबईत पाहायला मिळेल. कारण येथील एसटी प्रवर्गातील दोन्ही जागेवर ठाकरेंचेच उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे एसटी प्रवर्गाचे विजयी उमेदवार नाहीत. त्यामुळे आरक्षण सोडत अत्यंत महत्वाची बनली आहे.
